बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना, बेळगावात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या एका ३७ वर्षीय माजी सैनिकाचा अनगोळ परिसरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बेळगाव शहरातील अनगोळ परिसरात गुरुवारी दुपारी हि दुर्दैवी घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, इब्राहिम देवलापूर (वय ३७) हे भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले माजी सैनिक अनगोळ परिसरात बाजारात गेले होते. यावेळी त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. काही क्षणांतच ते जागीच कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले.
मात्र, रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा क्षण बाजारातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. देशासाठी कर्तव्य बजावलेल्या एका जवानाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात आणि विशेषतः शहरी भागात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचप्रमाणे कमी वयात होणाऱ्या मृत्यूमुळे आरोग्य क्षेत्रातही चिंता व्यक्त होत आहे. जात आहे.



