बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात असताना 6.75 लाख रुपये किंमतीचे 1930 किलो गोमांस रामनगर पोलिसांनी जप्त केले आहे.
रामनगर पोलीस उपनिरीक्षक महांतेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी वाहन चालक सिद्धाप्पा बाळाप्पा बद्दूर आणि क्लिनर राजू बाळनाईक बेळगाव यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमोल मोहनदास रा. बेळगाव याचा शोध पोलीस घेत आहेत
अनमोड घाटातील रस्ता खचल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद सद्या बंद आहे. त्यामुळे रामनगर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महांतेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर येथे पोलीसांकडून गस्त घालण्यात येत होती.
यावेळी रामनगर शिवाजी सर्कल येथे एएसआय राजाप्पा दोडमणी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अडवून दुसऱ्या दिशेने जाण्यासाठी दिशा दाखवत होते. त्यावेळी टाटा कंपनीचे हौदा वाहन के ए 25 ए बी 6640 गोव्याच्या दिशेने जात होते. त्या वाहन चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले असता, तो न थांबताच गोव्याच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे संशयाने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पुढे जामिया मशीद जवळ त्याचे वाहन अडवून चौकशी केली, असता, त्यामध्ये 1930 किलो गोमांस त्याची अंदाजे किंमत 6.75 लाख रुपये आढळून आले.
याप्रकरणी चालक आणि वाहकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमोल मोहनदास राहणार बेळगाव हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

