बेळगाव लाईव्ह : रताळ्याची वेल काढायला गेलेल्या शेतकऱ्याला सापाने दंश केल्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावात घडली आहे. या घटनेत रवींद्र शिवाजी कांबळे वय 38 असे या युवा दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतात काम करत असताना विषारी सापाच्या दंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावात घडली.
रवींद्र हा आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामावर गेला होता. शेतात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रताळ्याच्या वेली तोडत असताना खाली दडलेल्या सापाने रवींद्रच्या हाताला दोनदा डंख मारला. रवींद्रला सापाने चावल्याचे लक्षात येताच उपचारासाठी तातडीने त्याला बेळगाव बिम्स रुग्णालयात नेत असताना दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

रवींद्र याच्या आकस्मिक मृत्यूमुळे बिम्स रुग्णालय परिसरात पोहोचलेल्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मयत रवींद्र यांच्या पश्चात आई -वडील, पत्नी, दोन लहान मुले आणि भाऊ असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळून शोक कळा झाल्याने अनावर झाल्याने एकच हंबरडा फोडला होता त्यावेळी उपस्थितांचे देखील डोळे पाणावले होते.
बेळवट्टीचे माजी ता. पं. सदस्य एन. के. नलवडे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना घडलेल्या दुर्घटनेची माहिती देऊन शासनाने मयत रवींद्र कांबळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करण्याची मागणी गावाच्या वतीने केली आहे. सर्पदंशाची सदर घटना बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


