बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलिस आयुक्तालय व्याप्ती अंतर्गत पोलिसांचे एक विशेष अँटी स्टॅबिंग स्क्वाड अर्थात भोसका-भोसकी विरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने काल केलेल्या पहिल्या कारवाईत न्यू गांधीनगरच्या एका युवकाला अटक करून त्याच्याकडील जांबिया जप्त करण्यात आला.
बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने भोसका-भोसकी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या (सीबीटी) ठिकाणी गेल्या दोनच दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला भोसकण्यात आल्याची घटना घडली.
या घटनेनंतर सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेत बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या सूचनेवरून पोलिस आयुक्तालय व्याप्ती अंतर्गत एक विशेष अँटी स्टॅबिंग स्क्वाड स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने हिरेबागेवाडी, काकती, उद्यमबाग, टिळकवाडी, खडेबाजार आणि मार्केट पोलीस स्थानकांच्या व्याप्तीत आपल्या कारवाईला प्रारंभ केला आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखालील अँटी स्टॅबिंग स्क्वाड मधील अधिकारी व पोलिसांनी काल गुरुवारी सीबीटी बस स्थानकासह विविध प्रमुख ठिकाणी तपास मोहीम राबवली यावेळी विद्यार्थी आणि तरुणांना अडवून त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या.

त्याचप्रमाणे त्यांना आपल्या सोबत धारदार शस्त्रे बाळगणे कसे चुकीचे आहे याविषयी माहितीही देण्यात आली. या विशेष पथकाकडून चाकू, तलवारी वगैरे धारदार शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगण्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
याव्यतिरिक्त शहर पोलीस आयुक्तालयाकडून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे किंवा त्यांचे प्रदर्शन करणे हा दंडनीय गुन्हा आहे, अशी सार्वजनिक सूचना देखील जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखालील अँटी स्टॅबिंग स्क्वाडने काल सायंकाळी पहिली कारवाई करताना न्यू गांधीनगरच्या एका युवकाला अटक केली. अटक केलेल्या युवकाचे नांव अप्सर अब्दुल रशीद शेख (वय 42, रा. मुल्ला गल्ली न्यू गांधीनगर) असे आहे. गांधीनगर जवळील उड्डाणपुलाखाली तपासणी करताना अप्सर चालवत असलेल्या डीओ दुचाकीच्या डिक्कीत जांबिया आढळून आला.
तो जांबिया जप्त करून पोलिसांनी अप्सर शेख याला ताब्यात घेतले आहे. एकंदर धारदार शस्त्राने होणारे प्राणघात हल्ले रोखण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्थापन केलेल्या नव्या अँटी स्टॅबिंग स्क्वाड या पथकांकडून सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी संशयीतांना अडवून तपासणी केली जाणार आहे.



