बेळगाव लाईव्ह : बेळगावची ओळख वापरून हुबळी-धारवाडला झुकते माप दिल्याचा आणि बेळगावच्या योजना हुबळी-धारवाडला वळविल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपण्णावर यांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्यावर केला आहे. शेट्टर यांच्या राजकीय भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, बेळगावच्या हितासाठी त्यांनी दिलेले योगदान सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.
आज बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना टोपण्णावर यांनी खासदार शेट्टर यांच्यावर जोरदार टीका केली. ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी भारताला लुटून ब्रिटनला श्रीमंत केले, त्याचप्रमाणे खासदार जगदीश शेट्टर हे बेळगावचा मुखवटा घालून हुबळी-धारवाडला फायदा पोहोचवण्याचे काम करत आहेत, असे खळबळजनक विधान त्यांनी केले.
म्हादई प्रकल्पावरून त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. भारताला लुटून ब्रिटिशांनी ब्रिटनला श्रीमंत केले, त्याचप्रमाणे बेळगावच्या योजना आणि पाणी हुबळी-धारवाडला नेले जात आहे, असे टोपण्णावर म्हणाले.
म्हादई प्रकल्पामुळे वनसंपदा नष्ट झाली, तर आपल्या भागात पाऊस कमी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. धारवाडच्या औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवण्यासाठी आपल्या भागातील वनसंपदा नष्ट करणे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.

गेली ३०-४० वर्षांपासून भीमगढ अभयारण्य वाचवण्याचे काम या भागातील पर्यावरणवाद्यांनी निस्वार्थपणे केले आहे, याकडे टोपण्णावर यांनी लक्ष वेधले. मात्र, खासदार जगदीश शेट्टर यांनी त्यांचा संघर्ष गोवा-प्रायोजित असल्याबद्दल केलेले विधान निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले.
खासदार जगदीश शेट्टर बेळगावचा मुखवटा घालून हुबळी-धारवाडला फायदा करून देत आहेत. जर पर्यावरणवाद्यांचा लढा प्रायोजित असेल, तर त्यांनी ते सिद्ध करावे, असे आव्हान टोपण्णावर यांनी पुन्हा दिले.




