‘आमचे पाणी, आमचा हक्क’ आंदोलनाची बैठक

0
2
 belgaum

बेळगाव लाईव्ह : म्हादई आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वनसंपदेला धोका निर्माण झाला असून, जर हा प्रकल्प उभारण्यात आला तर संपूर्ण उत्तर कर्नाटकचे रूपांतर पावसाअभावी वाळवंटात होईल, यासाठी या प्रकल्पांविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार बेळगावात पार पडलेल्या ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ आंदोलनाच्या बैठकीत करण्यात आला.

बेळगावमधील मराठा मंगल कार्यालयात ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ या आंदोलनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पश्चिम घाटातील वनसंपदा आणि नद्यांचे स्रोत वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन नितीन धोंड यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, मलप्रभा, अघनाशिनी, म्हादई, कळसा-भांडुरा या नद्यांचे पाणी निसर्गसंचालित पद्धतीने समुद्रात विलीन होते.

ही प्रक्रिया जंगलातील जैवविविधता टिकवण्यास मदत करते. शेवाळाने भरलेली ही नदी कार्बन डायऑक्साइडचे शुद्धीकरण करतात. त्यामुळे म्हादई व कळसा-भांडुरा प्रकल्प राबवल्यास हजारो हेक्टर वनक्षेत्र आणि त्यातील प्रजाती नष्ट होतील. म्हादई प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटक वाळवंटात रूपांतरित होईल. शिवाय, हा प्रकल्प राबवल्यास बेळगाव जिल्ह्याला एक थेंबही पाणी मिळणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. हिडकल धरणाचे पाणी धारवाड औद्योगिक क्षेत्रासाठी वळवण्यात येत असून, स्थानिकांना पाण्यावाचून ठेवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

 belgaum

पर्यावरणवादी दिलीप कामत यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, खानापूरच्या वनक्षेत्रात अतिसंवेदनशील भाग असून, हजारो झाडांची कत्तल करून म्हादई प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न होतो आहे. २०२४ पर्यंत धारवाड जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही, तरीही हा प्रकल्प रेटून नेला जातो आहे, हे आश्चर्यकारक आहे, असे ते म्हणाले. राजकीय हेतूंमुळेच ही कामे केली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. गोवा आणि महाराष्ट्र सरकारने प्रकल्पास विरोध केला असूनही, केंद्र सरकार आणि वनविभागाने याला परवानगी नाकारली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बैठकीत जंगल आपली भाषा बोलत नाही, पण आज ते आक्रोश करत आहे, अशा शब्दांत पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी ‘जनमोर्चा’साठी हाक दिली आहे. उत्तर कर्नाटकमधील नद्या आटत चालल्या आहेत, जंगलं नष्ट होत आहेत आणि निसर्गाची तिव्र हाक ऐकण्याची ही शेवटची वेळ आहे, असा इशारा देत हा मोर्चा केवळ आंदोलन नसून निसर्ग रक्षणाची सामूहिक शपथ असल्याचे सांगण्यात आले. “प्रत्येक तोडलं गेलेलं झाड म्हणजे चोरलेलं भविष्य,” हे लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांनीही आपला आवाज उठवावा, असे आवाहन करत ‘जंगलासाठी या, नद्यांसाठी चला आणि बेळगावसाठी उभे राहा’ हा संदेश देत ३ जून रोजी सकाळी १० वाजता सरदार ग्राउंड येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, शेतकरी नेते चुनप्पा पुजारी, मल्लेश चौगुले, नितीन बोळबंडी, सिद्धगौडा मोदगी, म. ए. युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. सर्वांनी एकमुखाने पश्चिम घाट वाचवण्यासाठी आणि म्हादई प्रकल्पाविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.