बेळगाव लाईव्ह :पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी आज सकाळी मनपा आयुक्तांसमवेत दरवर्षी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होणाऱ्या शिवाजीनगर भागातील गटारी व नाल्याचा पाहणी दौरा केला.
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील शिवाजीनगर येथे कांही भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर आता पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे महापौर पवार आणि उपमहापौर जोशी यांनी आज गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्या समवेत शिवाजीनगरला भेट दिली.
याप्रसंगी त्यांच्या समवेत स्थानिक नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह संबंधित अधिकारीवर्ग उपस्थित होता. महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी शिवाजीनगर येथील विविध भागातील गटारी व नाल्याची पाहणी करून सांडपाणी निचऱ्याची समस्या जाणून घेतली.


यावेळी नगरसेवक मंडोळकर आणि स्थानिक नागरिकांनी महापौर व उपमहापौरांना गटार व्यवस्था आणि पावसाळ्यात निर्माण होणारी पाणी तुंबण्याची समस्या याबद्दल माहिती दिली. सदर माहिती जाणून घेऊन महापौर मंगेश पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
त्याचप्रमाणे त्वरेने योग्य त्या उपाययोजना करून यावेळी शिवाजीनगर येथे पावसाचे पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले.


