बेळगाव लाईव्ह : सध्या संपूर्ण राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, निसर्गाचे मनमोहक रूप सर्वत्र पाहायला मिळत आहे.
विशेषतः निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बेळगाव शहरात पावसाच्या सरींनी सृष्टीला नवचैतन्य दिले आहे. बेळगावहून खानापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांना सध्या एक वेगळाच अनुभव मिळत आहे.
या मार्गावरील प्रवास म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव आहे. हिरवीगार शेते, धुक्यात हरवलेले डोंगर आणि कोसळणाऱ्या पावसाच्या धारा यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे.
याच मार्गावर किल्ले राजहंस गडाचे विहंगमय दृश्य पर्यटकांना आणि प्रवाशांना थक्क करत आहे. पावसाळ्यात गडावर दाटून येणारे ढग आणि त्यातून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी अनेकजण इथे थांबून या दृश्याचा आनंद घेत आहेत.
पावसामुळे निर्माण झालेले हे निसर्गरम्य वातावरण बेळगावच्या सौंदर्यात भर घालत असून, शहरातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक वेगळेच आकर्षण ठरत आहे.


