एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी प्रथमच नाही कोणतेही पुरवणी परीक्षा शुल्क

0
16
Exam recruits
 belgaum

बेळगाव लाईव्ह :यंदा बेळगावमध्ये एसएसएलसी परीक्षेत अनुत्तीर्ण अर्थात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आगामी पुरवणी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी अनेक शाळांनी विशेष उपचारात्मक वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण शिक्षण खात्याने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या एसएसएलसी परीक्षेच्या निकालामध्ये सर्व शैक्षणिक जिल्ह्यांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या निकालाने शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी शाळांना जलद कारवाई करण्यास प्रवृत्त केले आहे. पुरवणी परीक्षा येत्या 25 मे पासून सुरू होणार असून सरकारने पहिल्यांदाच या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कोणतेही परीक्षा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्याद्वारे त्यांना अत्यावश्यक असलेला दिलासा दिला आहे.

शाळांनी कोणत्या विषयांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या आधारावर ते पुरवणी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी त्या विशिष्ट विषयांवर लक्ष केंद्रित करणारे विशेष वर्ग आयोजित करण्याची योजना आखत आहेत. या विशेष वर्गांसाठी वेळापत्रक आणि विषयांची माहिती विद्यार्थ्यांना कळवली जाईल आणि मंगळवारपासून वर्ग सुरू होतील.

 belgaum

शिक्षण खाते वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करत असूनही विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी पुरवणी आणि तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त व्हावे याकरिता शिक्षण खाते सक्रियपणे काम करत आहे.

एकट्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातच 12,187 विद्यार्थी नापास झाले आहेत. त्याचप्रमाणे सर्व तालुक्यांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची संख्या कित्तूरमध्ये सर्वाधिक आहे, त्यानंतर बेळगावचा क्रमांक लागतो. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नांवनोंदणी करण्याकरिता त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

विशेष उपचारात्मक वर्गासंदर्भात बोलताना जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ म्हणाल्या की, मी या संदर्भात शिक्षक संघटनेशी चर्चा केली आहे आणि बैठकीची आणखी एक फेरी आयोजित केली जाईल. विशेष उपचारात्मक वर्ग बहुदा मंगळवारपासून सुरू होतील. सुमारे 4458 विद्यार्थी एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत.

त्यांना 15 दिवसांत तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून ते विषय उत्तीर्ण करू शकतील. यंदाच्या एसएसएलसी परीक्षेतील शैक्षणिक जिल्हावार कामगिरी (अनुक्रमे तालुका : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यानुसार) पुढील प्रमाणे आहे. कित्तूर : 1095, 518. बेळगाव शहर : 5617, 2822. सौंदत्ती : 3294, 1907. खानापूर : 2115, 1301. बैलहोंगल : 2266, 1554. रामदुर्ग : 2325, 1675. बेळगाव ग्रामीण : 2872, 2,3759. एकूण : उत्तीर्ण 19584, अनुत्तीर्ण 12187.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.