बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील महेश्वरी शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून, कठोर मेहनत, मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अपार अडचणींवर मात केली आहे.
बेळगावमधील नेहरू नगर येथील महेश्वरी शाळा फॉर द ब्लाइंड या अंध विद्यार्थ्यांच्या शाळेचा दहावी निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत एकंदर यशाचा टक्का अत्यंत समाधानकारक असून, अनेक विद्यार्थ्यांनी A+ आणि A ग्रेडमध्ये उत्तीर्ण होऊन गुणवत्तेची उंची गाठली आहे.
विद्यार्थिनी खुशी पांडुरंग नाईक हिने 98.24 टक्के गुण मिळवून संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्यामागोमाग प्रुथ्वी नरळेकर याने 96.64 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि प्रज्वल पत्तार याने 95.84 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. हे विद्यार्थी अंध असूनही त्यांनी मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. शाळेतील एकूण 22 विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उज्ज्वल निकाल सादर केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या वर गुण मिळवले असून, अंधत्वावर मात करत त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण मांडले आहे.

या यशामध्ये मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, पालकवर्ग आणि सर्व सेवकवर्गाचा मोलाचा वाटा असून, विद्यार्थ्यांच्या यशाची ही शाळेसाठी आणि बेळगावसाठी अभिमानाची बाब आहे. अंधत्व ही अडथळा नसून प्रेरणास्थान ठरू शकते, हे या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे.
माहेश्वरी शाळेतील यशस्वी निकाल समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि संधी दिल्यास तेही उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण बेळगावातून कौतुक होत आहे.



