बेळगाव लाईव्ह :आनंदनगर, सेकंड क्रॉस येथील कांही ठराविक घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने संबंधित रहिवाशांची मोठी गैरसोय, कुचंबना होत असून इतरांप्रमाणे आम्हाला देखील व्यवस्थित पाणीपुरवठा केला जावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे
आनंदनगर, सेकंड क्रॉस येथील महिलावर्गाने बेळगाव लाईव्हसमोर केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या भागात पाणी पुरवठा केला जातो त्यावेळी इतर सर्वांच्या घरगुती नळांना पाणी येते, मात्र कांही मोजक्या सात-आठ घरांना पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे संबंधित गृहिणी, महिलांना घागरी घेऊन इतरांच्या दारातून पाणी आणून आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागत आहे.
घरात नळ असूनही त्या पद्धतीने त्रास सहन करावा लागत असल्यामुळे महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असते. पाणी पुरवठा केला जातो त्यावेळी नेमकी आमची मधली सात -आठ घरे सोडून आजूबाजूच्या सर्व घरांना कसे काय पाणी मिळते? हा दुजाभाव का? असा त्यांचा सवाल आहे.
पिण्याचे पाणी आले नाही म्हणून प्रत्येक वेळी टँकर मागवणे किंवा दुकानातील विकतचे पाणी आणणे हा यावरचा पर्याय नव्हे. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मोजकी सात-आठ घर सोडून इतर सर्वांना पाणीपुरवठा कसा काय होतो? याची चौकशी करून आम्हाला देखील पिण्याचे पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी आनंदनगर, सेकंड क्रॉस येथील त्रस्त महिलावर्गाने केली आहे.
त्याचप्रमाणे एक तर आम्हाला देखील पाणी पुरवठा करावा अन्यथा या संपूर्ण भागातील पाणी पुरवठा थांबवावा असा सल्ला त्यांनी दिला. तसेच परिसरातील इतरांप्रमाणे संबंधित सात -आठ घरांना वेळच्यावेळी व्यवस्थित पाणी पुरवठा झाला नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


