belgaum

“जय किसान’च्या संचालक मंडळ विरुद्ध जुने व्यापारी आक्रमक

0
26
Jai kisan
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील जय किसान होलसेल भाजी मार्केट मधील 14 जुन्या व्यापाऱ्यांवर मोठा अन्याय होत असून व्यापारी संघटनेची निवडणूक झालेली नसताना जुन्या संचालकांकडून आम्हाला प्रचंड त्रास दिला जात असल्याचा आरोप अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांनी केला आहे.

शहरामध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप करण्यात आला. जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या संस्थापकांपैकी एक असलेले दिवंगत गजानन देवाप्पा पावशे यांच्या कन्या असलेल्या व्यापारी सुचेता गजानन पावशे यांनी अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांच्यावतीने बोलताना सांगितले की, जय किसान होलसेल भाजी मार्केट व्यापारी संघटनेच्या संचालकांकडून आम्हा 14 व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. जुने 50 वर्षापासूनचे व्यापारी असूनही अद्यापपर्यंत आम्हाला मार्केटमध्ये दुकान गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. अद्यापपर्यंत एपीएमसी कायद्यानुसार नव्याने निवडणूक घेऊन संघटनेचे नवे संचालक मंडळ निवडण्यात आलेले नाही.

त्यामुळे सध्या भाजी मार्केट संघटनेच्या संचालक मंडळाचे सदस्य देखील आता संचालक राहिलेले नाहीत. मात्र तरीही त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना विशेष करून आम्हा 14 जणांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी ही आहे की एपीएमसी कायद्यानुसार जय किसान होलसेल भाजी मार्केट व्यापारी संघटनेची निवडणूक घेऊन नवे संचालक मंडळ स्थापन करावे.Jai kisan

 belgaum

दुसरं म्हणजे जुन्या संचालक मंडळाने आम्ही दुकान गाळ्यांसाठी भरलेल्या पैशाचा हिशोब द्यावा. मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना संघटनेचे सभासद करून घेण्यात यावे. दुकान गाळ्यांसाठी संबंधित 14 व्यापाऱ्यांना त्वरेने दुकान गाळे उपलब्ध करून दिले जावेत. कारण स्वतःच्या मालकीचे दुकान गाळे नसल्यामुळे या व्यापाऱ्यांच्या धंद्याला मार बसवत असून त्यांना त्रास होत आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे एपीएमसी आणि जय किसान भाजी मार्केट मधील भांडणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

याव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या तुलनेत जय किसान भाजी मार्केट मधील दर देखील घसरले असून येथील व्यापार जबरदस्त मंदीत सुरू आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे आम्हा जुन्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची काळजी लागून राहिली आहे.

व्यापारी संघटनेच्या संचालक मंडळाने जाणून बुजून आम्हा 14 व्यापाऱ्यांना सदस्यत्व दिलेले नाही कायद्यानुसार आम्हाला रीतसर सदस्य करून घेणे बंधनकारक असताना. वारंवार मागणी करून देखील तुम्ही आमचे विरोधक आहात आम्ही तुम्हाला सभासद करून घेणार नाही असे आम्हाला सांगितले जात आहे.

हा मोठा अन्याय असून याची चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी सुचेता पावशे यांनी केली. मी स्वतः या मार्केटचे संस्थापक अध्यक्षांची मुलगी असूनही मला त्रास दिला जात आहे. स्वतःला जय किसान होलसेल भाजी मार्केट व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष बनवणाऱ्या मोहन मन्नोळकर यांनी तर अलीकडेच मला माझ्या दुकानातून जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःसोबत स्वतःचे बाऊन्सर आणि 30 -40 लोक घेऊन त्यांनी हा गैरप्रकार केला.

या मार्केटचा पाया घालणाऱ्या आम्हा व्यापाऱ्यांवरच अन्याय केला जात असून रीतसर पैसे भरून देखील आज पर्यंत आम्हाला आमच्या मालकीचे दुकान गाळे जाणीवपूर्वक देण्यात आलेले नाहीत. याउलट पूर्वीच्या किल्ला भाजी मार्केटमधील भाडेकरू असलेल्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी दुकान गाळे देण्यात आले असून संबंधित व्यापारी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अरेरावी आणि दादागिरी करत असतात, अशी माहिती व्यापारी सुचेता गजानन पावशे यांनी पत्रकारांना दिली. याप्रसंगी फकीर गुडाजी, कृष्णा देसाई, डी. एम. नेसरगी, मोसिन खानापुरे आदी अन्यायग्रस्त व्यापारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.