क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तीची माहिती उघड केल्याबद्दल लेखनाचा छंद जोपासणाऱ्या एका साहित्यिक व्यावसायिकाने महानगरपालिका अधिकाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याचा निर्धार केला आहे.
गेल्या 21 दिवसांपूर्वी या व्यवसायिकाच्या आईचे निधन झाले.आईचे पार्थिव कोल्हापूरला रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.अंत्यसंस्कार झाल्यावर हे व्यावसायिक त्याच रुग्णवाहिकेतून बेळगावला परतले.
बेळगावला आल्यावर नियमानुसार त्यांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली.नंतर वीस दिवसांनी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या बंधू,वहिनींना कोरोनाची लागण झाल्याचे समजले.ही बाब कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवली.बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिकेकडे पाठवले.महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे पत्र उघड केले.त्यामुळे हे पत्र सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाले आहे.
सध्या या व्यावसायिकाला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.आपली माहिती असलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास झाला असून हे पत्र उघड करणाऱ्या मनपा अधिकार्यविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे या व्यावसायिकाने ठरवले आहे.





