भारतासह जगभरातील कोरोना विषाणूच्या थैमानामुळे अन्य क्षेत्राप्रमाणे छायाचित्रकारितेच्या व्यवसायावर देखील मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यंदाचा संपूर्ण सिझन वाया गेल्यामुळे छायाचित्रकार खचून गेलेले दिसत आहेत. तथापि छायाचित्रकारांनी निराश होऊन खचून न जाता सकारात्मक ऊर्जा घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करावी, असे आवाहन सुप्रसिद्ध छायाचित्रकार डी. बी. पाटील यांनी “बेळगाव लाईव्ह”च्या माध्यमातून केले आहे.
कोरोना विषाणूमुळे भारतासह संपूर्ण जग हादरून गेले आहे. आपल्या छायाचित्रकार बंधूंवर देखील मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कारण या तीन महिन्याच्या सिझनवर त्यांचे 12 महिन्याचे आर्थिक गणित अर्थात ताळमेळ ठरलेला असतो. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा सीझन वाया गेला असल्याने हा आर्थिक ताळमेळ डळमळलेला आहे. परिणामी प्रत्येक छायाचित्रकार चिंतेत आहे. आता पोटापाण्यासाठी काय करायचे? या विचाराने अनेक जण निराश झाले आहेत. परंतु छायाचित्रकारांनी आर्थिक व मानसिक दृष्ट्या अजिबात खचून जाता कामा नये. कारण सिझन पुन्हा येत असतो, परंतु आपण जर खचून गेलो तर काहीच करू शकत नाही. तेंव्हा आपले कसे होणार हा विचार डोक्यातून काढून टाकून त्यापेक्षा पुढल्या सीझनला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे गेले पाहिजे हा विचार करणे आवश्यक आहे, असे मत डी. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, आपण छायाचित्रकार बऱ्याचदा आपल्या सीझनचा विषय कुटुंबासमोर मांडतो अथवा त्यांच्याशी शेअर करत असतो. त्यामुळे होते काय की, आपल्या त्रासामुळे आपल्या कुटुंबालाही त्रास होऊ शकतो. तेंव्हा कुटुंबियांशी आवश्यक तेवढ्याच गोष्टी बोलाव्यात. आपण खचलो तर आपले कुटुंब ही खचून जाते याचा विचार प्रत्येकाने करणे भाग आहे. सध्याची परिस्थिती आपल्यासाठी स्पीडब्रेकर सारखी आहे. एखाद्या सुसाट वाहनाचा वेग स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी मंदावतो आणि स्पीड ब्रेकर ओलांडले की तो वेग पुन्हा वाढतो. सध्या आपल्यासाठी लॉक डाऊन अथवा कोरोनाचे संकट हे आपल्या जीवनातील या स्पीडब्रेकर प्रमाणे आहे, असे समजले पाहिजे. हा स्पीडब्रेकर आपण ओलांडला की आपला जीवन क्रम पुन्हा वेगाने सुरू होईल याची जाणीव सर्वांनी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी छायाचित्रकारांनी बिलकुल खचून न जाता आपला आर्थिक ताळमेळ आज ना उद्या व्यवस्थित रुळावर येऊ शकतो हे ध्यानात घ्यावे. मात्र यासाठी धीर न सोडता खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे, असे डी. बी. पाटील यांनी स्पष्ट केले.

*कॅमेर्यांकडे दुर्लक्ष नको*
आपण छायाचित्रकार कर्ज काढून उत्तमोत्तम महागाचे कॅमेरे घेतो. तेंव्हा सद्यपरिस्थितीत निराश होऊन त्या कॅमेर्यांकडे दुर्लक्ष करू नये. त्यांची देखभाल व्यवस्थित करणे गरजेचे आहे. अन्यथा काम नाही म्हणून आपण जर ते धूळखात ठेवले तर ऐनवेळी त्यांच्यात बिघाड निर्माण होऊ शकतो. परिणामी त्याच्या दुरुस्ती आणि साफसफाईसाठी पैसे खर्च करण्याची वेळ येऊ शकते. यासाठी सध्याच्या परिस्थितीत आपली अन्य कामे करण्याबरोबरच कॅमेऱ्याची देखभाल त्याची निगा राखणे महत्त्वाचे आहे, असेही डी. बी. पाटील यांनी सांगितले.
तेंव्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे खचून न जाता कोणतेही वाईट विचार मनात न आणता भारतासह संपूर्ण जग कोरोना मुक्त व्हावे यासाठी आपण प्रार्थना करूया, आणि लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊन आपण नव्या जोमाने आपल्या व्यवसायात उभे राहूया, अशी अपेक्षा शेवटी छायाचित्रकार डी. बी. पाटील यांनी व्यक्त केली.




