बेळगाव लाईव्ह:रामनाथ मंगल कार्यालयाचा सभामंडप भरलेला होता… टाळ्यांचा कडकडाट, भजनाचा नाद आणि डोळ्यांत पाणी आणणारी एक शांत भावना हवेत तरंगत होती. समोर व्यासपीठावर बसले होते—ज्यांनी आयुष्यभर फक्त दिले, कधीच मागितले नाही. किणये येथील संगीत रत्न शंकर पाटील……..
४८ वर्षे त्यांनी भजन शिकवले—पैशासाठी नव्हे, प्रसिद्धीसाठी नव्हे; तर भक्तीसाठी आणि संस्कारांसाठी. शेकडो महिलांना संगीताची वाट दाखवणारे हे गुरू आज मात्र शब्दशः भारावून गेले होते. कारण त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त, त्यांच्या शिष्यांनी गुरुदक्षिणेच्या रूपाने जे काही दिले, ते केवळ आर्थिक नव्हते—ते होते गुरूच्या नि:स्वार्थ ज्ञानदानावर उमटलेले कृतज्ञतेचे सोनसळी शिक्कामोर्तब…
आजच्या काळात जिथे ज्ञानालाही दरपत्रक असते, तिथे बेळगावात एका गुरूने आयुष्यभर मोफत शिकवले—आणि शिष्यांनी चक्क पाच लाखांची गुरुदक्षिणा देत इतिहास घडवला!
किणये येथील संगीत शिक्षक शंकर पाटील यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता ७०० महिलांना भजनाचे धडे दिले. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त १९ महिला भजनी मंडळांनी रोख 5.21 लाखांची गुरुदक्षिणा देत “गुरू कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही” हे बेळगावात प्रत्यक्ष दाखवून दिले.
रविवारी भाग्यनगर बेळगाव येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे श्री शंकर पाटील गुरुजी अमृत महोत्सव समितीतर्फे उपरोक्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी 9 वाजता सत्कारमूर्ती संगीत रत्न शंकराव लक्ष्मण पाटील (गुरुजी) यांना अनगोळ येथील श्रीहरी मंदिरापासून सवाद्य भजन म्हणत मिरवणुकीने रामनाथ मंगल कार्यालयापर्यंत आणण्यात आले. अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुरुजींच्या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, मराठा मंदिर बेळगावचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, बेळगाव बार असोसिएशनचे माजी प्रभारी अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सार्वजनिक वाचनालय बेळगावचे अध्यक्ष नेताजी जाधव, मदन बामणे, गंगाराम दिवटे आणि विद्यानंद निलजकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून माजी महापौर मालोजीराव अष्टेकर हजर होते. प्रारंभी भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलनाने सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शंकरराव पाटील (गुरुजी) यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे केक कापून गुरुजींचा 75 वा वाढदिवस साजरा केला गेला.
वाढदिवस साजरा केल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांची शंकरराव पाटील (गुरुजी) यांच्या निस्वार्थ कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.यावेळी मराठा जागृती निर्माण संघ आणि सर्व महिला भजनी मंडळातर्फे संगीत रत्न शंकरराव पाटील (गुरुजी) यांना 5,21,290 रुपयांचा धनादेश गुरुदक्षिणेच्या स्वरूपात देण्यात आला. अखेर सत्कारमूर्ती गुरुजींनी आपले विचार व्यक्त केल्यानंतर गोपाळराव बिर्जे यांच्या अध्यक्षीय भाषणाने सोहळ्याची सांगता झाली.
याप्रसंगी लक्ष्मणसा हनमसागर, दीपक धडौती, श्रीधर प्रभू धोत्रे, प्रकाश अष्टेकर, भरत तोपिनकट्टी, प्रेमानंद गुरव, जयदीप बिर्जे अनंत लाड, विश्वनाथ सव्वाशेरी आदिंसह हितचिंतक, विविध भजनी मंडळांचे सदस्य आणि गुरुजींचा शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होता. सोहळा यशस्वी करण्यासाठी गोपाळराव बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली शितल व विश्वनाथ शंकर पाटील, विद्या तोपीनकट्टी, चंद्रज्योती देसाई, लक्ष्मी काकतीकर, रुक्मिणी निलजकर, सोनाली लोहार, कविता बामणे, नेहा हेरेकर, रूपा वाडेकर, रूपाली सव्वाशेरी, सुवर्णा लाड, वर्षा निलजकर वगैरेंनी परिश्रम घेतले.
कोणतीही अपेक्षा न ठेवता ज्ञानदान करणे, प्रसिद्धीपासून दूर राहणे आणि गुरू-शिष्य परंपरेची पवित्रता जपणे—हीच शंकर पाटील यांच्या तपश्चर्येची ओळख. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिष्यांनी दिलेली पाच लाख रुपयांची गुरुदक्षिणा ही रक्कम नसून, नि:स्वार्थ सेवेला मिळालेली कृतज्ञतेची सर्वोच्च पावती आहे.
आजच्या व्यापारीकरणाच्या काळातही “विद्या विकायची नसते, वाटायची असते” हे मूल्य आयुष्यभर जपणारे शंकर पाटील हे केवळ संगीत शिक्षक नाहीत, तर गुरूपदाचा खरा अर्थ जगणारे व्यक्तिमत्त्व आहेत.




