belgaum

पत्रकार दिनी प्रशासनाविरोधात या पत्रकारांचा आवाज

0
1550
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिता समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा सजग पहारेकरी म्हणून कार्य करते, हीच भूमिका अधोरेखित करत खानापूर नगरपंचायतीच्या माजी नगरसेवक राहिलेल्या सध्या पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

खानापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला राजा शिवछत्रपती चौक ते मरिअम्मा मंदिर (हलकर्णी क्रॉस) दरम्यानचा रस्ता मंजूर आराखड्यानुसार करण्यात यावा, या मागणीसाठी माजी नगरसेवक व पत्रकार दिनकर  मरगाळे आणि विवेक  गिरी यांनी खानापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या खानापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असून, संबंधित रस्ता मंजूर आराखड्यानुसार होणे अत्यावश्यक आहे. मात्र या मार्गावर असलेली काही दुकाने व बेकायदेशीर अतिक्रमणे रस्त्याच्या कामात अडथळा ठरत आहेत. या अडथळ्यांमुळे विकासकामे रखडत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 belgaum

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अडथळे हटविण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा नगरपंचायतीला नोटिसा दिल्या आहेत. तरीदेखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संबंधित ठेकेदार, दुकानदार व बेकायदेशीर अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचेही माजी नगरसेवक व पत्रकारांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर, चार दिवसांच्या आत सदर अतिक्रमणे तात्काळ हटवून रस्त्याचे काम मंजूर आराखड्यानुसार पूर्ण करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा चार दिवसांनंतर नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

तसेच, या आंदोलनादरम्यान आमच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायतीचे प्रशासक व खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार, मुख्याधिकारी संतोष कुरबेट तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असेही निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बेळगाव, जिल्हा पोलीस प्रमुख बेळगाव, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी, खानापूरचे तहसीलदार तसेच खानापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवरच प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात पत्रकारांनी आवाज उठवल्याने खानापूर नगरपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून, येत्या चार दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.