बेळगाव लाईव्ह : सौदत्ती यल्लम्मा मंदिरात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि भाविकांवर होणारा अन्याय रोखण्याच्या मागणीसाठी मंगळवारी ‘जय भीम भारतीय हिंदू ढोर समाज सेवा संघा’च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंदिर प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले.
यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विशेष सुविधेच्या नावाखाली सर्रास लूट केली जात आहे. दर्शनासाठी नियमबाह्य पद्धतीने पैसे उकळणे हा कायद्याने गुन्हा असून, भाविकांना नाहक त्रास दिला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मंदिरात येणारे वृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र रांगेची कोणतीही सोय उपलब्ध नाही. संपूर्ण मंदिर प्रशासन भ्रष्टाचारात अडकले असून, सामान्य भाविकांच्या सोयींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी या आंदोलनात राजू टोंबरे, गोपाळ पिंपरे, अनिल चौगुले, शिवकुमार हुली व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.





