बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन करून बेळगाव, गोकाक आणि चिक्कोडी असे तीन नवे जिल्हे निर्माण करावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. जिल्हा त्रिभाजनावरील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या लवकरच आमदारांची बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्याच्या त्रिभाजनाची मागणी खूप जुनी आहे. बेळगाव, गोकाक आणि चिक्कोडी असे तीन जिल्हे करण्याची मागणी पूर्वीपासूनच प्रलंबित आहे. अलीकडे बैलहोंगल आणि अथणी या गावांनाही जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी पुढे आली असली तरी, बेळगाव जिल्ह्याचे केवळ तीनच भागांमध्ये त्रिभाजन व्हावे, असे आमचे मत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा त्रिभाजनासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या लवकरच जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतील आणि त्यानंतरच जिल्ह्यांच्या त्रिभाजणाबद्दल निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जारकीहोळी यांनी दिली.
या त्रिभाजनामुळे मराठी-कन्नड भाषिक संघर्ष वाढणार नाही किंवा कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. सध्या कोणतेही अहिन्द संमेलन आयोजित करण्याची योजना नाही, मात्र भविष्यात परिस्थितीनुसार यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.




