बेळगाव लाईव्ह :आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगावसह राज्याच्या विविध भागातील चर्मकारांनी अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या नेतृत्वाखाली आज सुवर्ण विधानसौध समोर धरणे आंदोलन केले.
अखिल कर्नाटक चर्मकार महासभेचे अध्यक्ष भीमराव पवार आणि सरचिटणीस मनोहर मंडोळी यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सुवर्ण विधानसौध समोर छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनात राज्यातील असंख्य चर्मकारांनी सहभाग दर्शवला होता.
यामध्ये समगार, मचगार, ढोर आणि चर्मोद्योगाशी निगडित उपजाती बांधवांचा समावेश होता आंदोलनादरम्यान चर्मकार बांधवांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर करण्यात आले. चर्मकार समुदायासाठी स्वतंत्र विकास निगम स्थापन करण्यात यावे.
दर 6 वर्षांनी चर्मकार समुदायातील एका व्यक्तीला सरकारकडून विधान परिषद सदस्य म्हणून नामनिर्दिष्ट केले जावे. चर्मकार समाज बांधवांना सुसज्ज समुदाय भवन निर्मितीसाठी अनुदान दिले जावे. सरकारकडून उभारली जाणारी समुदाय भवने चर्मकारांनाही मंजूर करावीत. हुबळी येथील लिडकर कॉलनी मधील रहिवाशांना घराची खरेदी पत्रे दिली जावीत. केपीएससी मध्ये चर्मकारांना योग्य स्थान दिले जावे. अन्य स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या चर्मकारांना सरकारने आर्थिक सहाय्य करावे.
चर्मकार समाजातील आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले जावे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, विजयपूर, बागलकोट, गदग, गुलबर्गा वगैरे जिल्ह्यांमध्ये चर्मकारांची संख्या मोठी आहे. तथापि या भागात चर्मकार समाजाची कोणतीही शिक्षण संस्था नाही. त्यासाठी चर्मकारांची मोठी संख्या असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण संस्था उभारण्यासाठी 10 एकर जमीन मंजूर करावी, वगैरे विविध मागण्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.
आंदोलन स्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगावचे चर्मकार हिरालाल गोपाळ चव्हाण यांनी सांगितले की, अखिल कर्नाटक चर्मकार महासभेतर्फे आजच्या धरणे कार्यक्रमात बेळगाव, रायबाग, अथणी, कोप्पळ, हुबळी वगैरे राज्यातील विविध गावातून हजारो चर्मकार सहभागी झाले आहेत. बऱ्याच वर्षांपासून चर्मकार बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 1976 साली लीडकर बोर्ड स्थापन झाले तेंव्हापासून आजतागायत बेळगाव मध्ये चर्मकरांसाठी फक्त 24 घरे देण्यात आली आहेत. त्यानंतर आता 2025 मध्ये दुकानांसाठी 23 खोटी देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त चर्मकारांसाठी कौशल्य विकास किंवा इतर प्रशिक्षण वगैरे कोणतेही समाज हितकारी उपक्रम राबवण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे लिडकर बोर्डाची स्थापना ही फक्त नावाला झाली आहे. प्रत्यक्षात आमच्या समाजाला कोणत्याही निगम मंडळाचे अध्यक्षपद, चेअरमनपद , संचालकपद नाही किंवा कोणतेही सरकार नियुक्त आमदारपद अथवा सदस्यत्व देण्यात आलेले नाही. निवडणुकीवेळी राजकीय पक्षांना चर्मकार समाजाची फक्त मते हवी आहेत. आमचा समाज कायम दुर्लक्षित राहिला आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.




