बेळगाव लाईव्ह : खानापूर शहरामधील विद्यानगर भागात किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचा शेवट रक्तापातात झाला आहे. एका तरुणावर चाकूने वर्मी वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असून, याप्रकरणी खानापूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रेयस देसाई यांना आरोपी ऋषांत पुजारी हा मागील एक महिन्यापासून लग्न मोडल्याच्या कारणावरून फोनवरून धमकावत होता.
याच विषयावर तोडगा काढण्यासाठी ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता श्रेयसला विद्यानगरमध्ये बोलावण्यात आले होते. त्यानुसार श्रेयस आपला मित्र आदर्श नागराज कोलेकर आणि इतरांसह तिथे पोहोचला असता आरोपीने शिवीगाळ करत वाद सुरू केला.
हा वाद सोडवण्यासाठी आदर्श कोलेकर मध्यस्थी करत असताना संतापलेल्या ऋषांतने आपल्याकडील चाकूने आदर्श यांच्या छातीवर, मानेवर आणि हातावर गंभीर वार केले. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे आदर्श यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर बेळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खानापूर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ऋषांत पुजारी आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.





