belgaum

डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गाची महापौर, उपमहापौरांनी केली पाहणी

0
101
 belgaum

बेळगाव लाईव्ह :महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या मंगळवार दि 14 मार्च 2026 रोजी साजरा होणाऱ्या 135 व्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या मार्गाचा आज बुधवारी सकाळी महापौर व उपमहापौर यांनी पाहणी दौरा केला.

दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरांमध्ये यंदा देखील विविध कार्यक्रम व उपक्रमांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. यंदा देखील अशा कार्यक्रम व उपक्रमांची रेलचेल असणारा असून या डॉ. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील डॉ. आंबेडकर उद्यानापासून कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कलपर्यंत भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन केले जाणार आहे.

बेळगावच्या प्रथम नागरिक महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हणमंत कोंगाली यांनी आज बुधवारी सकाळी महापालिकेतील सत्ताधारी गटनेते, काही नगरसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी मल्लेश चौगुले, सिद्राय मेत्री तसेच अधिकारीवर्गासमवेत मिरवणुकीच्या मार्गाचा पाहणी दौरा केला. यावेळी उभयतांनी उपस्थित अधिकारी व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊन आवश्यक सूचना केल्या.

 belgaum

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना मल्लेश चौगुले यांनी आजच्या महापौर उपमहापौर यांच्या पाहणी दौऱ्याबद्दल सांगून डॉ. आंबेडकर जयंती दिवशीच्या मिरवणुकीत सहभागी नागरिक व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल मार्गे कॅम्प येथील डॉ आंबेडकर सर्कलपर्यंत आवश्यक ठिकाणी पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत वगैरे आवश्यक सुविधासह दुपारच्या भोजनाची व्यवस्था बेळगाव महापालिकेने केली असल्याची माहिती दिली.

या पद्धतीने डॉ आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होण्यासाठी बेळगाव महापालिका गेल्या 20-22 वर्षांपासून जे कार्य करत आहे त्यासारखे कार्य कर्नाटक राज्यासह देशात कुठल्याही महापालिकेकडून केले जात नाही असे मल्लेश चौगुले यांनी अभिमानाने सांगून महापौर उपमहापौर यांच्यासह महापालिकेच्या समस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच ही परंपरा अशीच पुढे अखंड सुरू ठेवावी, अशी अपेक्षा चौगुले यांनी व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.