बेळगाव लाईव्ह : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, कोणत्याही परिस्थितीत नागरिक आणि जनावरांना पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रशासकीय उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्ह्यात एकूण ५०० ग्रामपंचायती असून सद्यस्थितीत कोठेही गंभीर पाणीटंचाई नसल्याचे स्पष्ट करत, भविष्यातील धोका ओळखून १२६ अतिसंवेदनशील गावांची यादी तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत आटल्यास तात्काळ पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली टँकरची आगाऊ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पाणी साठवण्याच्या मुख्य स्त्रोतांवर, विशेषतः धरणांमधील पाणीपातळीवर प्रशासन आता चोवीस तास लक्ष ठेवून आहे. धरणातील पाण्याचे नियोजन करताना पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी लागणारे पाणी याचे समतोल वाटप करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले जाणार आहे. टंचाईग्रस्त भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक खाजगी कूपनलिका (बोअरवेल) अधिग्रहित करण्याचे स्पष्ट आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, पाणीटंचाईचा गैरफायदा घेणाऱ्या खाजगी टँकरचालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. शहरी भागात पाण्याचा तुटवडा निर्माण करून नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळणाऱ्या टँकरचालकांवर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करण्याचा पवित्रा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या सर्व उपाययोजनांमुळे जिल्ह्यावर यंदा पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी व्यक्त केला.





