बेळगाव लाईव्ह : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेल्या इंधन पुरवठ्यामुळे बेळगाव शहरातील रिक्षाचालकांना गेल्या काही दिवसांपासून इंधनासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या एलपीजी टंचाईची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने आता विशेष नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, गॅस वितरणातील तांत्रिक अडथळे दूर करण्याचे आदेश दिले आहेत.
बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी इंधन टंचाईच्या भीषणतेवर प्रशासकीय भूमिका मांडली. शहरात सीएनजीचा पुरवठा सुरळीत असला तरी, काही खासगी एलपीजी पंपांनी पुरवठा रोखल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत.
यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मल्लिकार्जुन कलादगी यांची जिल्हास्तरीय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते तेल कंपन्यांशी थेट चर्चा करून टंचाई दूर करतील, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.
व्यावसायिक वापराच्या एलपीजीबाबत सध्या दिवसाला ७०० सिलिंडरचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. लहान हॉटेल चालक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना सिलिंडर मिळवताना होणारी ओढाताण थांबवण्यासाठी हॉटेल असोसिएशनला विश्वासात घेण्यात आले आहे.
मोठ्या व्यावसायिकांनी आधीच साठा केल्याने बाजारपेठेत कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, याकडे प्रशासन लक्ष देत असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नमूद केले.
रिक्षाचालकांचा वेळ इंधनाच्या रांगेत जात असल्याने त्यांच्या दैनंदिन कमाईवर गदा आली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी खासगी पंपांवरील साठा वाढवण्यावर भर दिला जात आहे. येत्या दोन दिवसांत गॅस वितरणाची साखळी पूर्ववत करून रिक्षाचालकांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे.





