बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी आणि किणये परिसरात ‘मालिनी रिसोर्सेस’कडून सरकारी नियमांची पायमल्ली करत बेकायदा खाणकाम सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
सरकारी जमिनीचे बळकावणे आणि पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या कारभाराविरुद्ध खाण आणि भूविज्ञान संचालकांकडे पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेळगुंदीमधील सर्व्हे नंबर २८५ ही जमीन महसूल विभागाच्या दप्तरी सरकारी असतानाही, तिथे मालिनी रिसोर्सेसला उत्खननाचा परवाना कसा मिळाला, असा गंभीर सवाल सुजित मुळगुंद आणि राजकुमार टोपण्णवर यांनी उपस्थित केला आहे.
महसूल आणि वन विभागाने दिलेल्या ना हरकत दाखल्यात या सर्व्हे नंबरचा कुठेही उल्लेख नव्हता, मात्र खाण विभागाने जाणीवपूर्वक हा नंबर परवान्यात समाविष्ट केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सध्या या ठिकाणी पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून उत्खनन सुरू आहे. विशेष म्हणजे मालिनी रिसोर्सेसचा पर्यावरण परवाना २०२३ मध्येच संपला आहे, तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. याशिवाय किणये गावातील सर्व्हे नंबर १८३ आणि १८४ मधून चोरट्या मार्गाने बॉक्साईट काढून ते बेळगुंदीच्या खाणीत आणले जात आहे.
या संपूर्ण घोटाळ्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अवैध उत्खनन रोखावे आणि दोषी अधिकाऱ्यांसह कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रकरणाची प्रत सादर करण्यात आली असून, या तक्रारीमुळे खाण माफियांचे धाबे दणाणले आहेत.





