बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चव्हाट गल्ली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांनी महापालिकेविरोधात रणशिंग फुंकले आहे. ड्रेनेजमिश्रित पाण्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासकीय अनास्थेविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले.
चव्हाट गल्लीतील महिलांनी महापालिकेच्या कारभाराचा तीव्र निषेध केला आहे. भर उन्हाळ्यात नळांना दूषित पाणी येत असून ते ड्रेनेजमिश्रित असल्याचे दिसून येत आहे. सध्या या परिसरात ड्रेनेज पाईपलाईन आणि एल अँड टी कंपनीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम एकाच वेळी सुरू आहे. या कामामुळे पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असून यामुळे परिसरात रोगराई पसरली आहे. अनेक लहान मुले आणि वृद्धांना जुलाब, उलट्यांचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.
परिसरातील पाण्याची समस्या अत्यंत गंभीर झाली असून ८ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. एल अँड टी कंपनीने ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत, ज्यामुळे अडचणीत अधिक भर पडली आहे. यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. आज महिलांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या सर्व प्रकाराची माहिती देण्यासाठी मोर्चा काढला आहे.
या गंभीर परिस्थितीला प्रशासन की लोकप्रतिनिधी जबाबदार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोहेल संगोळी हे या भागाचे नगरसेवक आहेत. महापालिकेकडून पाणीपट्टीची वसुली वेळेवर केली जाते, मात्र पाणी वेळेवर देण्याबाबत कोणीही गांभीर्याने बघत नाही. संपूर्ण गल्ली बेवारस झाली असून विकासकामे रखडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या दहा वर्षांपूर्वी या भागासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, त्या निधीचा विनियोग कुठे झाला याची कोणतीही माहिती जनतेला नाही. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असून निधीचा दुरुपयोग झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. घरपट्टी, नळपट्टी आणि कचरापट्टीची नियमित वसुली होऊनही समस्या सुटत नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्याचा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे.
येत्या काळात शुद्ध आणि वेळेवर पाणीपुरवठा झाला नाही, तर चव्हाट गल्लीतील सर्व पाईपलाईन फोडल्या जातील, अशी प्रतिक्रिया एका संतप्त नागरिकाने दिली.

गल्लीमध्ये खड्डे खोदून तिथे खडी टाकण्यात आली आहे. नळाच्या पाण्यात खडी अडकल्यामुळे पाईपलाईन ब्लॉक झाली असून दूषित पाणी येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून वारंवार निवेदने देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया एका महिला रहिवाशाने दिली.
आंदोलनाची दखल घेत महापालिकेने गल्लीत पाण्याचा टँकर पाठवला आहे. मात्र, ही समस्या कायमस्वरूपी न सुटल्यास येत्या काही दिवसांत एल अँड टी कंपनीच्या पिण्याच्या पाईपलाईन फोडल्या जातील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी महापालिकेला दिला आहे.





