belgaum

कोबीच्या दरात घसरण; हताश शेतकऱ्याने शेतात फिरवला ट्रॅक्टर

0
155
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राममधील एका शेतकऱ्याने कोबीच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे हताश होऊन आपल्या दोन एकरातील उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून ते पूर्णपणे नष्ट केले आहे. बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्याने वाहतुकीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे.

कडोली येथील शेतकरी अप्पासाहेब देसाई यांनी मोठ्या अपेक्षेने आणि कर्ज काढून आपल्या दोन एकर जमिनीत कोबीची लागवड केली होती. बियाणे, खते, पाणी आणि मजुरी यासाठी हजारो रुपये खर्च करून त्यांनी हे पीक जोपासले होते. पीक चांगले आल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असतानाच बाजारपेठेत दराचा मोठा घसरगुंडी झाली, ज्यामुळे सदर शेतकऱ्यावर संकट ओढवले.

कोबीची काढणी करून ती बाजारपेठेत नेण्यासाठी येणारा खर्चही विक्रीतून भरून निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोबी विकण्यापेक्षा ती शेतातच गाडून टाकणे योग्य असल्याचे मानून अप्पासाहेब देसाई यांनी संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरवला. भाजीपाला पिकांना सरकारने कोणताही हमीभाव जाहीर न केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 belgaum

या घटनेनंतर अप्पासाहेब देसाई यांनी सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला. आम्ही केलेल्या कष्टाला आज काहीच किंमत उरलेली नाही आणि पीक पिकवूनही शेवटी नुकसानच पदरी येत असल्याची भावना अप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केली.

उत्तर कर्नाटकातील शेतकरी सध्या ज्या संकटाचा सामना करत आहेत, त्याचे विदारक रूप या घटनेतून समोर आले आहे. कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा, बाजारपेठेतील दरांवर नियंत्रण असावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.