बेळगाव लाईव्ह : मच्छे गावातील वाघवडे क्रॉस जवळ असलेल्या सराफी दुकानांमध्ये गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या चोरीचा छडा लावताना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या जवळील 20 लाखाहून अधिक किमतीच्या चांदीच्या साहित्यांसह एकूण 21,57,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव श्रीनिवास यांना उर्फ शिना उर्फ शिनु (वय 37, रा. कालिदास बडावणे, कोरटगेरे जि. तुमकुर, सध्या रा. लग्गेरे मार्केट जवळ, लग्गेरे बेंगळुरू -58) असे आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहापूर बेळगाव येथील महेश गोकुळ काकतीकर यांच्या मच्छे गावातील वाघवडे क्रॉस जवळ असलेल्या सराफी दुकानांमध्ये गेल्या 18 जानेवारी 2026 रोजी चोरी झाली होती.
याप्रकरणी काकतीकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद करून घेण्यात आला होता. त्यानंतर बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) पोलीस उपायुक्त (गुन्हे व रहदारी) आणि बेळगाव ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागणगौडा कट्टीमनीगौड्र यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने चोरीचा तपास सुरू केला होता. या तपासा दरम्यान हाती लागलेल्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी श्रीनिवास यांना ताब्यात घेतले.

त्यावेळी पोलीस चौकशीत आरोपी श्रीनिवास याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्या जवळील 20 लाख 7 हजार 250 रुपये किमतीचे चांदीचे साहित्य आणि 1 लाख 50 हजार रुपये किमतीची टाटा इंडिका कार गाडी (क्र. केए 03 एस 8668) पोलिसांनी जप्त केली.
सदर कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांसह दोन्हीही पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस उपायुक्तांनी पोलीस निरीक्षक कट्टीमनीगौड्र व त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.





