बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे परवानाधारक (लायसन्स) सर्वेयरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कडक उन्हातही सर्वेअर रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन करत असून, सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यासह परिसरातील अनेक जिल्ह्यांतील सर्वेअर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. “आम्हाला कायमस्वरूपी सरकारी सर्वेअर म्हणून नियुक्त करावे” ही त्यांची मुख्य मागणी असून, समान कामासाठी समान वेतन, सेवा सुरक्षा आणि सामाजिक सन्मान देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ते सरकारी सर्वेअरप्रमाणेच सर्व कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडतात. मात्र, त्यांना नियमित वेतन, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी (PF) यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. सध्या “फाईलप्रमाणे मानधन” या पद्धतीने काम दिले जात असून, अनेकदा दोन-तीन महिन्यांनी पैसे दिले जातात, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच, कामासाठी आवश्यक सुविधा, बसण्याची सोय, सहाय्यक कर्मचारी यांचाही अभाव असल्याची तक्रार करण्यात आली आहे. उन्हाळा, पावसाळा, तसेच धोकादायक परिस्थितीत काम करूनही कोणतीही सेवा सुरक्षा नसल्याने सर्वेअरांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नवीन भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून विद्यमान परवानाधारक सर्वेअरांना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.अखिल कर्नाटक सरकारी परवानाधारक भू-मापक संघाने सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनादरम्यान भर उन्हात चन्नम्मा चौक आरटीओ सर्कल दरम्यान मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले होते याचा फटका सामान्य नागरिकांना बसला.
बेळगाव येथील सर्वे राणी केलेल्या प्रशासनाकडे प्रमुख मागण्या अशा आहेत.
🔴 प्रमुख मागण्या:
परवानाधारक भू-मापकांना कायमस्वरूपी सरकारी सर्वेअर म्हणून नियुक्ती
समान कामासाठी समान वेतन, सुविधा व सेवा सुरक्षा
आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन यांसारख्या सुविधा
“फाईलप्रमाणे पैसे” ही पद्धत रद्द करून नियमित वेतन प्रणाली लागू करणे
नवीन भरती प्रक्रिया रद्द करून आधीच्या सर्वेअरांना प्राधान्य





