belgaum

अतिवाड पाणीप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक

0
209
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील अतिवाड या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत भीषण बनला असून, या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध शेतकरी संघटना आणि रयत संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गावातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शनिवारी संघटनांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देण्यात आली. मात्र, आंदोलक पंचायत कार्यालयात पोहोचले असता तेथे सचिव आणि संबंधित जबाबदार अधिकारी गैरहजर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

विशेष म्हणजे, या निवेदनाबाबत दोन दिवसांपूर्वीच रीतसर आणि अधिकृत पूर्वसूचना देण्यात आली होती, असे असतानाही केवळ जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कर्तव्याच्या वेळी जबाबदार अधिकारी उपस्थित नसणे, हा लोकशाहीचा आणि ग्रामस्थांच्या हक्कांचा अपमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 belgaum

सध्या अतिवाड गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा वणवण फिरावे लागत आहे. कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. वारंवार विनंती करूनही प्रशासन कोणतीही ठोस कृती करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये हवालदिलता पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनांनी आता प्रशासनाला दोन दिवसांचा निर्वाणीचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. जर येत्या ४८ तासांत पाणी प्रश्नावर ठोस तोडगा काढून नियमित पाणीपुरवठा सुरू केला नाही, तर संपूर्ण गावाला सोबत घेऊन उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

तसेच, कामात कसूर करणाऱ्या आणि विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगविषयक कारवाई करावी आणि गावाची तहान भागवण्यासाठी मंजूर असलेल्या कायमस्वरूपी पाणी योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे. आता यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.