बेळगाव लाईव्ह :पाण्याचे रक्षण आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या प्यास फाउंडेशनतर्फे एकेपी फेरोकास्ट्सच्या मदतीने पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या वडगाव येथील शतायुषी विहिरीच्या विकासाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे स्थानिक रहिवाशात समाधान व्यक्त होत आहे.
शंभर वर्षांपूर्वी वडगाव संस्थानचे संस्थानिक पटवर्धन यांनी एक विहीर बांधली जी पुढील अनेक दशकांपर्यंत वडगावची जीवनरेषा होती. कालांतराने नळाचे पाणी आणल्याने या विहिरीचे महत्त्व कमी झाले. परंतु 2016 -17 मध्ये बेळगाव शहरात दुष्काळ पडला आणि या विहिरीचे महत्त्व पुन्हा वाढले.
मात्र एका दुर्दैवी दिवशी विहिरीच्या भिंती अचानक कोसळून ती बुजुली आणि तिचे कचराकुंडीत रूपांतर झाले. या पद्धतीने शंभर वर्षांचा वारसा कायमचा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता.
मात्र वेळेवर मदतीला धावलेल्या प्यास फाउंडेशन या संस्थेने एकेपी फेरोकास्ट्सच्या सहकार्याने विहिरीला आणखी एक संधी दिली. विहिरीने त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला आणि कोसळलेला ढिगारा साफ केल्यानंतर जिवंत झरे सापडले.
ज्यामुळे स्थानिकांच्या आशा पल्लवीत होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. पुनरुज्जीवनाच्या या कार्यानंतर दररोज पंपिंग केल्यानंतरही विहिरीत आता 25 फूट पाणी असते.
हा प्रकल्प आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. ज्यामध्ये कोसळलेल्या सर्व भिंतींचे पुनश्च नव्याने बांधकाम करून विहिरीला आधार मिळवून दिला जाणार आहे. याबद्दल स्थानिक रहिवाशी प्यास फाउंडेशन आणि एकेपी फेरोकास्ट्स यांची प्रशंसा करून धन्यवाद देत आहेत.





