belgaum

दळवी साहेब…

0
826
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :खरं म्हणजे काही माणसं अश्वत्थाम्याच्या जखमेप्रमाणे वेदना घेऊनच जन्माला येतात—न भरून येणारी, पण सतत जिवंत ठेवणारी. त्या वेदनेतूनच त्यांचा लढा जन्म घेतो, आणि त्याच वेदनेतून ते स्वतःलाही घडवतात, समाजालाही दिशा दाखवतात.

“मराठा क्रांती मोर्चा करताय, पण त्यात आमचा प्रश्न कुठे आहे, पाटील? आम्हाला सीमा प्रश्नाशिवाय दुसऱ्या कशातच रस नाही…” दळवी साहेब अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडत होते. त्यांचा एकच ध्यास—सीमा प्रश्न. आम्ही मराठा समाजाचे प्रश्न, युवकांची अवहेलना, आरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करत होतो; पण त्यांच्या मनाचा ठाव घेताना एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती—त्यांचा जीव फक्त सीमाप्रश्नातच गुंतलेला होता.

आमच्यात तेव्हा फारशी जवळीक नव्हती, पण एक खात्री होती—हा माणूस ऐकतो, विचार करतो आणि जे पटते त्यावर ठाम उभा राहतो. “आमचा प्रश्न जिथे असेल, तिथेच आम्ही आहोत,” ही त्यांची कणखर भूमिका होती. याच भूमिकेने मराठा क्रांती मोर्च्यात सीमा प्रश्नाची मागणी स्थान मिळवून गेली. आणि मग—हा सेनानी खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरला. गावोगाव फिरणं, गल्लीबोळात सभा घेणं, लोकांना एकत्र करणे.

 belgaum

प्रत्येक गोष्टीवर जाणतेपणाने लक्ष ठेवणे.कोणतीही कसर न ठेवता लढा उभा केला गेला त्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यासोबत फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती— या माणसाला फक्त सीमाप्रश्न माहित नव्हता, तर सीमा भागातील प्रत्येक माणूस माहित होता. कोणाचे काय योगदान, कोण कुठे उभा आहे, कोणाची काय ताकद आहे—सगळं त्यांच्या मनात जणू नोंदलेलं होतं. लढा उभा करताना एक सेनापती जसे शत्रूची ताकद, आपली ताकद आणि संघर्षाचे मैदान यांचा अचूक अंदाज घेऊन मग मैदानात उतरतो तसं सगळं दळवी साहेब आपली रणनीती ठरवत असत.

सामान्य माणूस लढ्यात कसा उतरवायचा, नेते आणि जनतेतली दरी कधीच वाढू न देणं—हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य होतं. सीमा भागातली माणसं वर्षानुवर्षे लढत राहतात—लाठीकाठी झेलून, संकटं सहन करूनही संघर्ष का करतात यामागचं उत्तर एकच— सीमा लढ्याशी एकनिष्ठ असलेलं महाराष्ट्र एकीकरण समितीचं नेतृत्व. दळवी साहेब त्या परंपरेचे एक जाज्वल्य प्रतिनिधी होते. अनेकदा त्यांच्या घरी जाण्याचा योग यायचा. ते नेहमीच आपुलकीने स्वागत करायचे आणि एकच प्रश्न विचारायचे— “लढा जोरात चाललाय ना?” एकदा त्यांच्या हस्ते प्रकाशनाच्या वेळी त्यांनी ज्या जराजर्जर अवस्थेत भाषण केलं, ते पाहताना डोळ्यांसमोर एकच गोष्ट उभी राहिली— हा माणूस शरीराने थकलेला असेल, पण मनाने अजूनही रणांगणात उभा आहे.

उच्चशिक्षित असूनही त्यांनी मोठ्या पदांचा मोह टाळला. कारण त्यांच्यासाठी एकच ध्येय होतं— मराठी माणसाचा प्रश्न. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून कदाचित हे अव्यवहार्य वाटू शकेल, पण मराठी समाजाच्या वाटचालीत त्यांचं योगदान मात्र अमूल्य आहे. आज दळवी साहेब आपल्यात नाहीत, ही गोष्ट मनाला पटत नाही. कारण त्यांच्यासारखं खंबीर, निष्ठावंत आणि अभ्यासू नेतृत्व मिळणं दुर्मिळ असतं. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यापुढे अस्खलित इंग्रजीत, मुद्देसूदपणे आपली बाजू मांडणारा तो आवाज— आता पुन्हा ऐकायला मिळणार नाही.

दळवी साहेब गेले… पण पेटवलेली लढ्याची मशाल अजूनही तेवतच राहणार आहे. त्यांचा लढा निमाला नाही तर तो अधिक धगधगता होणार आहे हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. आणि कदाचित— तोच त्यांच्या आयुष्याचा खरा विजय आहे.

गुणवंत पाटील (जेष्ठ साहित्यिक बेळगाव)


मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते लढवय्ये,कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्याने समीतीची व मराठी भाषिक लढ्याची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना! विलास बेळगावकर( समिती नेते खानापूर)

सीमाभागाचा खंबीर आधार हरपला…मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आदरणीय दीपक दळवी साहेब आज आपल्यातून कायमचे निघून गेले, ही बातमी मनाला चिरून जाणारी आहे. प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि धडाडीचं नेतृत्व यांचा संगम असलेली ही थोर व्यक्तीमत्त्व आज हरपलं. त्यांच्या जाण्याने सीमाभागातील प्रत्येक मराठी माणूस पोरका झाल्यासारखा वाटतो आहे.

चळवळीत काम करणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी दळवी साहेब म्हणजे केवळ नेता नव्हते, तर प्रेरणास्थान होते. त्यांच्या एका कौतुकाच्या शब्दाने, पाठीवरच्या एका थापेने आम्हाला नवसंजीवनी मिळायची. संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आम्हाला लढायला शिकवलं, उभं राहायला शिकवलं.

प्रशासनासमोर अभ्यासू, ठाम आणि प्रभावी भूमिका कशी मांडावी, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यांच्या नेतृत्वाखाली सीमालढ्याला नवी दिशा आणि बळ मिळालं.

साहेब, तुमच्या जाण्याने एक अपूरं न भरून येणारं पोकळी निर्माण झाली आहे. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचा लढाऊ बाणा आणि मराठी अस्मितेसाठीचा जाज्वल्य अभिमान आम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत राहील.तुमच्या या कार्यकर्त्याकडून तुम्हाला अखेरचा मनःपूर्वक जय महाराष्ट्र…
भावपूर्ण श्रद्धांजली

तुमचा विश्वासू कार्यकर्ता
शुभम विक्रांत शेळके

अखेरचा जय महाराष्ट्र दळवी साहेब
लढवय्या नेता कसा असावा तर तो दिपक दळवी यांच्या सारखा,जिल्हा प्रशासनाने आणि महानगरपालिकेने जेव्हा व्हॅक्सिन डेपो आमचे नाही असे सांगताच, ते तुमचे नसेल तर ते माझे आहे, कारण मी इथला भूमिपुत्र आहे आणि हा महामेळावा मी माझ्या जागेत भरवणारचं, कोण अडवते बघू म्हणून प्रशासनाला सडेतोड बोलणारा, वयाच्या अखेरपर्यंत गल्लीपासून मुंबई आणि दिल्लीपर्यंत सीमाप्रश्न सुटावा म्हणून जीव ओतून लढणारा, कोणाचीही जी हुजुरी न करता आणि कोणाचाही मुलाहिजा न बाळगता सीमाप्रश्नाची आणि मराठी माणसाची बाजू तडफेने मांडणारा नेता आज आपल्यातून निघून गेला. ही कधीही न भरून निघणारी पोकळी आहे.
ते नेहमी म्हणत, “लढण्यासाठी आपल्याकडे हत्यारे नसतील पण मनातील जी जिद्द आहे ती अणुबॉम्बपेक्षा कमी नाही. जिद्दीची ताकद मोठी आहे, त्याला कधीही शमवण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत लढत रहा.
आपण लढत राहिले पाहिजे आणि सीमाप्रश्नी विजय मिळविला पाहिजे. हीच खरी श्रद्धांजली दळवी साहेबाना ठरणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली दळवी साहेब.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.