belgaum

करवाढी विरोधात अनगोळ येथील व्यापारी, दुकानदारांचे आंदोलन

0
227
angol protest
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेने घरपट्टी आणि कचरा कर संकलन शुल्कातील 3 टक्के वाढीची कार्यवाही रद्द करावी, या मागणीसाठी अनगोळ येथील त्रस्त व्यापारी आणि दुकानदारांनी आज आंदोलन करून महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले.

बेळगाव महापालिकेने घरपट्टी आणि कचरा कर संकलन शुल्कात केलेल्या 3 टक्के वाढीच्या निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी अनगोळ येथील व्यापारी व दुकानदारांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. यावेळी अन्यायी कर वाढीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांनी थेट महापालिका गाठून मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले.

यंदाच्या 2026 -27 या वर्षासाठी मालमत्ता आणि इतर शुल्कांमध्ये वाढ करू नये, अशी मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती आधीच वाढवल्या आहेत, ज्याचा परिणाम सर्व ग्राहकोपयोगी वस्तूंवर होईल. त्यानुसार हॉटेलच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे आणि जनता हा भार सहन करण्याच्या स्थितीत नाही. गेल्या वर्षी बेळगाव शहर महानगरपालिकेने विद्यमान करावर 3 टक्के दराने मालमत्ता कर वाढवला होता, जो 3 वर्षांसाठी लागू राहणार होता. तथापी महानगरपालिकेच्या बैठकीत तसा कोणताही विषय विषय पत्रिकेवर नसताना 2026 -27 या वर्षासाठी मालमत्ता करात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे.

 belgaum

याव्यतिरिक्त असे समजते की, महापालिका प्रत्येक व्यावसायिक आस्थापनांकडून (दुकान, हॉटेल, रेस्टॉरंट, स्टेशनरीची दुकाने इत्यादी) कचरा कर वसूल करणार आहे, जो मालमत्ता करात आधीच नमूद आहे (म्हणजे दुकानांसाठी प्रति वर्ष 600 रु. आणि हॉटेल रेस्टॉरंटसाठी प्रति महिना 1200 रु.) तसेच जनतेला 31 मार्चपूर्वी तो भरण्याचा आग्रह केला जात आहे. याव्यतिरिक्त, महापालिका तलाव आणि रिंग रोड कर देखील वसूल करत आहे. ही रक्कम स्वच्छता निरीक्षकामार्फत वसूल केली जात असून, तो ‘तुमचा परवाना रद्द केला जाईल’ असे सांगून जनतेचा त्रास देत आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे.

ऑनलाइन व्यवसायामुळे आधीच छोटे आणि मध्यमवर्गीय व्यावसायिक आपले व्यवसाय बंद करत आहेत. परिणामी त्यांच्या कमाईवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे त्यांच्यासाठी खूप कठीण झाले आहे. जर जर संबंधित कर मागे घेण्यात आले नाहीत, तर जनता महापालिकेच्या विरोधात आंदोलन करेल. तरी अन्यायी कर वसुलीची कार्यवाही थांबवावी ही विनंती आहे. तसेच सर्व निवडून आलेले नगरसेवक, आमदार आणि खासदार यांनाही विनंती आहे की, त्यांनी योग्य कार्यवाही करून जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

आजच्या आंदोलनाप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी म्हणाले की, व्यापारी आणि दुकानदाराकडून बेळगाव महापालिका जे कर वसूल करत असते त्यामध्ये कचरा उचल करण्याच्या कराचा ही समावेश आहे. तथापि आता त्या व्यतिरिक्त आणखी अतिरिक्त 600 रुपये इतका कचरा उचल कर गोळा केला जात आहे. युद्धामुळे सध्या महागाई वाढली असून खाद्यतेल, गॅस वगैरे प्रत्येक गोष्टीचे दर भडकले आहेत. बहुतांश व्यापारी व दुकानदारांची परिस्थिती नाजूक झाली आहे. यासाठी कचऱ्यासाठी असलेला अतिरिक्त कर मागे घेण्यात यावा.

angol protest

कर भरला नाही तर तुमच्या दुकान परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नाही. तुमचे दुकान बंद करू असे आरोग्य निरीक्षकांकडून धमकावले जात आहे. त्याचप्रमाणे कोणतेही कारण न देता घरपट्टी देखील 3 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. खरंतर नियमानुसार दर तीन वर्षानंतर घरपट्टी वाढीचा विचार केला जातो. महापालिकेने मागील वर्षीच घरपट्टी 3 टक्के वाढवली असताना आता ती पुन्हा वाढवण्यात येत आहे. या पद्धतीने दरवर्षी घरपट्टी वाढवणे कायद्याला धरून नाही. त्यामुळे घरपट्टी वाढवली जाऊ नये. याव्यतिरिक्त महापालिका तलाव आणि रिंग रोड कर देखील वसूल करत आहे. या पद्धतीच्या कर वसुलीमुळे लोकांना किती त्रास होत आहे त्यांच्यावर किती बोजा पडत आहे याचा कोणीच विचार करायला तयार नाहीत.

नगरसेवकांसारखे स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या भागातील जनतेला सोयीसुविधा पुरवण्याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल नगरसेवक महापालिकेत आवाजच उठवत नाहीत. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची आमचे नगरसेवक सरकारकडे बोर्ड दाखवून हा झटकत आहेत हे योग्य नाही तेव्हा निवडून आलेले सर्व नगरसेवक आमदार आणि खासदारांना आमची विनंती आहे की सदर कर वाढीसंदर्भात गांभीर्याने विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करून सदर कर वाढीच्या विरोधात आम्ही आज महापालिकेला निवेदन सादर करत आहोत. त्यानंतरही जर अन्यायिकर मागे घेण्यात आला नाही तर आम्ही मोठे आंदोलन छेडू, असा इशारा माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.