belgaum

शालेय विद्यार्थी देतात पोलिस स्थानकाला भेट..

0
180
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी आणि वाढत्या वयातील चुकीच्या सवयींना वेळीच आळा बसावा या उद्देशाने ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली.

शाळेतील शिक्षक मनोहर करडी आणि शिक्षक मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती.

पोलीस प्रशासनाच्या विशेष निमंत्रणावरून झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. तक्रार नोंदणी प्रक्रिया, गुन्हे तपास पद्धती आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची भूमिका याविषयी अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि चांगल्या सवयींचे महत्त्व अधोरेखित केले. “आजची शिस्तबद्ध पिढीच उद्याचे सक्षम राष्ट्र घडवते,” असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणी जोपासण्याचे आवाहन केले.

सध्याच्या काळात वाढती व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा अतिवापर आणि चुकीच्या संगतीमुळे तरुण पिढी भरकटत असल्याची चिंता व्यक्त करत पोलिसांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा व कायद्याचा आदर राखण्याचा सल्ला दिला.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयीची भीती दूर होऊन विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले. “विद्यार्थी हे देशाचे सुजाण नागरिक बनावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” असे सांगत शाळेच्या मुख्याध्यापिका  सोनाली कंग्राळकर यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
शिस्त, जागरूकता आणि सकारात्मक मार्गदर्शनाचा संगम ठरलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव ठरला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.