बेळगाव लाईव्ह :पावसामुळे बळ्ळारी व लेंडी नाला फुटण्याच्या किंवा त्याला पूर येण्याच्या समस्येमुळे परिसरातील शेतकरी देशोधडीला लागत आहे. तेंव्हा नाल्यांच्या समस्येचा प्रशासनाने आता तरी गांभीर्याने विचार करून नाल्यांचा विकास तर साधावाच परंतु तत्पूर्वी या नाल्यांची युद्धपातळीवर व्यवस्थित साफसफाई करावी, अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत यांनी केली आहे.
तिला काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे बळ्ळारी मला काही ठिकाणी फुटून आसपासच्या शेतांमध्ये पाणी शिरण्याद्वारे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नेहमीप्रमाणे सातत्याने मागणी करूनही नाल्याची वेळच्यावेळी सफाई केली जात नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे. दर पावसाळ्यात स्वच्छते अभावी राष्ट्रीय महामार्गाच्या ब्रिजच्या ठिकाणी नाल्यातील सांडपाणी, गाळ -केरकचरा तुंबून पूर परिस्थिती निर्माण होत असते. नुकत्याच झालेल्या वळीव पावसामुळे नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरून बळ्ळारी व लेंडी नाल्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगाव शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत म्हणाले की, सातत्याने मागणी करून देखील बळ्ळारी नाल्याचा विकास किंवा वेळच्यावेळी स्वच्छता केली जात नसल्यामुळे पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. गेल्या 15-20 वर्षांपासून बळ्ळारी नाला स्वच्छता आणि विकासाच्या बाबतीत प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. नाला स्वच्छतेचे काम रखडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान होत आहे. यावेळी देखील कडधान्याचे काढणीला आलेले पीक नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे नाल्याचे पाणी शेतात शिरून नष्ट झाले आहे.
भाताच्या पिंजऱ्याच्या वळ्या पाण्यात भिजून मातीमोल झाल्या आहेत. काल परवाच्या पावसामुळे हा नाला तीन -चार ठिकाणी फुटून हिंद पासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील बळ्ळारी नाल्याच्या ठिकाणच्या ब्रिजच्या खाली अवैज्ञानिक पाईप घालून खोडसाळपणा केला आहे. या लहान आकाराच्या पाईपमुळे नाल्यातील पाण्याचा व्यवस्थित निचरा न होता ते पाणी शेतात शिरत आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच कारणीभूत आहे. शेतामध्ये शिरलेल्या पाण्यामुळे शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत असे सांगून बळ्ळारी नाल्याच्या समस्येचा प्रशासनाने आता तरी गांभीर्याने विचार करून या नाल्याचा विकास तर साधावाच परंतु तत्पूर्वी युद्ध पातळीवर बळ्ळारी व लेंडी नाल्याची चांगली साफसफाई करावी अन्यथा शेतकऱ्यांना उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा नारायण सावंत यांनी दिला.

अन्य एका शेतकऱ्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, वेळच्यावेळी साफसफाई केली जात नसल्यामुळे या भागातील लेंडी नाला व बळणारी नाला हे नाले पावसाळ्यात तुंबण्याची समस्या निर्माण होत असते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे बळ्ळारी नाला आणि त्याला जोडणाऱ्या लेंडी नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरून नव्याने उगवणाऱ्या ऊस पिकासह कडपाल अर्थात वाटाणा मोहरी सनी वगैरे कडधान्यांची पिकं जमीनदोस्त झाली आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयाचा देखील फायदा झालेला नाही.
पावसासह गारपीठांच्या वर्षावामुळे काकडी, पुदिना, लाल भाजी, मेथी वगैरे भाजीपाला पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती देऊन या पद्धतीने दरवर्षी देशाच्या पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ येत आहे. तरी सरकार प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य उपाययोजना करून आम्हा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्या शेतकऱ्याने केली. याप्रसंगी बळ्ळारी व लेंडी नाला परिसरातील बरेच शेतकरी उपस्थित होते.





