बेळगाव लाईव्ह: कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित आहे. या खटल्याची सलग सुनावणी होऊन सीमाभागातील मराठी जनतेला तातडीने न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आता जिल्हा मराठी पत्रकार संघाने कंबर कसली आहे. रविवारी मराठा मंदिर येथे आयोजित एका विशेष बैठकीत ‘सह्यांच्या मोहिमेचा’ शुभारंभ करण्यात आला.
या मोहिमेचे आवाहन करताना ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार आनंद मेनसे म्हणाले, “जेव्हा लेखक, पत्रकार आणि चित्रकार रस्त्यावर उतरतात, तेव्हा समाजात खऱ्या अर्थाने बदल घडतो. लोकशाही मार्गाने आपला हक्क मागताना भीती बाळगण्याचे कारण नाही. लाखो सह्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर तातडीने आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, काश्मीरसह देशातील अनेक सीमावाद मिटले, मात्र बेळगावचा प्रश्न अद्याप लोंबकळत आहे. सीमाभागातील जनता महात्मा गांधींच्या मार्गाने शांततेत लढा देत आहे, परंतु न्यायालयीन प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही. आता निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील यांच्याशी चर्चा करून, लाखो सह्यांचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे सोपवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांची पहिली सही घेऊन मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना सह्यांच्या मोहिमेसाठी विशेष पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
मनोहर किणेकर यांनी यावेळी आचार्य अत्रे यांच्या लेखणीचा दाखला दिला. “ज्याप्रमाणे अत्रेंच्या लेखणीमुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला, त्याचप्रमाणे पत्रकारांच्या पुढाकारामुळे ही मोहीमही यशस्वी होईल. ही देशातील अशा प्रकारची पहिलीच मोहीम असून, सीमाभागातील प्रत्येक घरात जाऊन सह्या गोळा कराव्यात,” असे आवाहन त्यांनी केले.
माजी महापौर व ज्येष्ठ पत्रकार नागेश सातेरी यांनी कर्नाटक सरकारच्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टात सीमा बांधवांना न्याय मिळणार याची खात्री असल्यामुळेच कर्नाटक सरकार सतत चालढकल करत आहे. कर्नाटक या प्रश्नावर जेवढे जागरूक आहे, तेवढा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र सरकारच्या तज्ज्ञ समितीत एकही मंत्री किंवा आमदार नाही; या समितीत जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश व्हायला हवा.”
बेळगाव महापालिकेत सीमा प्रश्नाविरोधात ठराव मांडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यावर आनंद मेनसे यांनी कडक शब्दांत इशारा दिला. “असा ठराव कायदेशीर लढ्यासाठी मारक ठरू शकतो. मराठी भाषिक बहुसंख्य असूनही असे ठराव कसे काय मांडले जातात? आता याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले. १९५६ मध्ये कृष्णराव देशपांडे यांनी महापालिकेवर भगवा फडकवून जी जनजागृती केली होती, तशाच एकजुटीची गरज त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, ज्येष्ठ पत्रकार शिवराज पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





