belgaum

‘या’ मंदिर परिसरातील उपद्रवी तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी

0
97
Logo belgaum live
 belgaum

बेळगाव लाईव्ह :चलवेनहट्टी (ता. जि. बेळगाव) येथील श्री गुड्डादेवी मंदिर परिसरात रंगीत पार्ट्या करुन गैरप्रकारांसह उपद्रव करणाऱ्या तळीरामांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी चलवेनहट्टी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे काकती पोलिसांकडे केली आहे.

चलवेनहट्टी ग्रामस्थांनी सादर केलेले निवेदन काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुंजनाथ यांनी स्वीकारले. तसेच आपण याप्रकरणी जातीने लक्ष घालून पोलीस गस्त वाढवण्याद्वारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. स्थानिकांना गैरप्रकार होत असल्याचे आढळून आल्यास 112 क्रमांकावर संपर्क साधावा. जेणेकरून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करतील, असेही पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांनी स्पष्ट केले. यावेळी मनोहर हुंदरे मंहातेश आलगोंडी, अभिजित आलगोंडी, वैजू पाटील, चंद्रकांत आलगोंडी, रघुनाथ आलगोंडी, राम करीबाळे आदीसह गावकरी उपस्थित होते.

गेल्या कांही दिवसांपासून श्री गुड्डादेवी मंदिर परीसरात गैर प्रकारांना ऊत आला असून या ठिकाणी काजूच्या बागामध्ये बाहेरील युवक मोठ्या प्रमाणात रंगीत पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. या पार्ट्यांमधून दारु पिऊन धांगडधिंगा घालणे, महिलांना पाहून अश्लील भाषेत शेरेबाजी करणे, नशेत दारुच्या बाटल्या फोडणे, सिगारेट पिऊन त्याची थोटके कुठेही फेकून देणे, आपापसांत हाणामारी करणे आदी प्रकार घडत आहेत.

 belgaum

सध्या उन्हाचा तडाखा असल्याने टाकलेल्या सिगारेटच्या जळत्या थोटक्यांमुळे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी अशाच घटनेमुळे एका शेतकऱ्याच्या झोपडीसह काजूच्या झाडांना आग लागून मोठे नुकसान झाले होते. लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी पोलिसांची गस्त सातत्याने होती. त्यामुळे या ठिकाणी तळीरामाना लगाम बसला होता. तथापी अलीकडे पोलिसांची गस्त कमी झाल्यामुळे तळीरामांकडून मोठ्या प्रमाणात पार्ट्याचे आयोजन करून उपद्रव केला जात आहे.

परीसरातील शेतकरी किंवा स्थानिक नागरिकांनी जाब विचारल्यास अरेरावी करत अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परीसरातील शेतकऱ्यांना हे तळीराम म्हणजे मोठी डोकेदुखी ठरले आहेत. तरी काकती पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून घडणाऱ्या गैर प्रकारांना आळा घालवा अशा आशयाचं मजकूर पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.