बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील हनुमान नगर परिसरात पेट्रोल चोरांच्या टोळीने उडवलेल्या धुमाकूळामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानाजवळच हा प्रकार घडला असून, हातात शस्त्रे घेतलेले चोरटे गाड्यांमधील पेट्रोल चोरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
बेळगावमधील हनुमान नगर येथील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत पेट्रोल चोरांच्या टोळीने एकापाठोपाठ एक चोऱ्यांचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
पेट्रोलचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सक्रिय झालेल्या या टोळीने तोंडाला मास्क लावून आणि हातात लाँग, मच्चू यांसारखी घातक शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला आहे. घरासमोर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकींना लक्ष्य करून ही टोळी पेट्रोल आणि डिझेल चोरत असल्याचे समोर आले आहे.
राज्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या घराच्या परिसरातच अशा घटना घडत असल्याने स्थानिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या चोरांच्या टोळीचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
केवळ दुचाकीच नव्हे, तर कारच्या टँकचे लॉक तोडून इंधन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.





