बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील श्री जत्ती मठ येथे कृतीशील मराठा समाज आणि बँक हितचिंतकांची महत्त्वाची बैठक पार पडली. मराठा सहकारी बँकेत सुरू असलेली २२ जागांची नोकर भरती प्रक्रिया संशयास्पद असून ती पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली.
मराठा सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेवर समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर जत्ती मठात जमलेल्या समाज बांधवांनी बँक प्रशासनाला जाब विचारण्याचे ठरवले असून, नोकर भरतीची जाहिरात प्रमुख माध्यमांतून का देण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
मराठा समाजाची इतकी मोठी बँक असताना तिच्या हितासाठी आवाज उठवणे आवश्यक आहे. आरबीआयच्या नियमानुसार नोव्हेंबर २०२५ लाच संचालकांची मुदत संपली आहे, तरीही ही घाई का? असा प्रश्न दत्ता जाधव यांनी उपस्थित केला. डिजिटल किंवा प्रिंट मीडियात जाहिरात दिली असती तर हजारो बेरोजगार मराठा तरुणांना संधी मिळाली असती, मात्र जाणीवपूर्वक जाहिरात लपवून यात ‘पाणी मुरत’ असल्याची शंका दत्ता जाधव यांनी व्यक्त केली.
नोकर भरतीसाठी किमान ५०० रुपये फी आकारली असती तरी बँकेचा मोठा आर्थिक फायदा झाला असता, पण व्यवस्थापनाने याचा विचार केला नाही हे दुर्दैव आहे. बँकेत सध्या सर्व काही आलबेल नसून या भरती प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे, असा आरोप दत्ता जाधव यांनी केला. या संदर्भात लवकरच बँकेच्या जनरल मॅनेजरना सविस्तर निवेदन देण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

या विषयावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी लवकरच दुसरी बैठक बोलावली जाईल, अशी माहिती कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई यांनी दिली. तसेच आजवर आपण आरक्षण, मराठा समाजाचे हक्क आणि अधिकार याबाबत अनेक विषयांवर आवाज उठवला असून मराठा समाजाच्या नोकर भरती प्रक्रियेबाबतही सविस्तर चर्चा करून तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीला दत्ता जाधव, अमित देसाई, सुनील बालकुंद्री, सूर्यकांत शिंदे, किरण हुद्दार, सुनील बोकडे, नारायण अष्टेकर, चंद्रकांत कोंडुसकर, यांच्यासह अनेक सभासद आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते.





