बेळगाव लाईव्ह : शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. जैन धर्मीयांच्या वतीने आयोजित या दिमाखदार सोहळ्याने संपूर्ण बेळगाव नगरी दुमदुमून गेली होती. ‘अहिंसा परमो धर्म’चा संदेश देत निघालेल्या या भव्य शोभायात्रेने सामाजिक जागृतीचा नवा आदर्श घालून दिला.
शहरातील ऐतिहासिक टिळक चौक येथे मुख्य जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, दक्षिणचे आमदार, माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, सुनील हणमण्णावर, शिवनगौडा पाटील तसेच आयोजक नरेंद्र जैन आणि राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत जैन ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या हस्ते शोभायात्रेला प्रारंभ झाला.
या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये सहभागी झालेले १०० हून अधिक कलात्मक चित्ररथ होते. भगवान महावीरांच्या जीवनावरील प्रसंग, जैन धर्माची तत्त्वे, महिला व बालकांचे पारंपारिक नृत्य आणि ‘सत्य धर्माचा विजय’ दर्शविणाऱ्या देखाव्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेली ही यात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
टिळक चौकातून सुरू झालेली ही शोभायात्रा रामलिंगखिंड गल्ली, कुलकर्णी गल्ली, मठ गल्ली, कपिलेश्वर उड्डाणपूल, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रोड आणि शहापूर खडे बाजार अशा प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. अखेर महावीर भवन येथे हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत या यात्रेची यशस्वी सांगता झाली.





