belgaum

बेळगावच्या विकासाचा गळा घोटला जातोय ; टोपन्नावर

0
259
 belgaum

बेळगाव लाईव्ह : धारवाड येथील ‘केआयएडीबी’चे कार्यालय बेळगावला स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बेळगावच्या हक्काचे प्रकल्प जाणीवपूर्वक हुबळी-धारवाडला वळवले जात असून, यामुळे जिल्ह्याचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावमधील अनेक मोठे प्रकल्प हुबळी-धारवाडला स्थलांतरित झाले आहेत. बेळगाव हे प्रादेशिक मुख्यालय असूनही येथील विभागीय कार्यालये हळूहळू दुसऱ्या शहरात हलवली जात आहेत. “प्रकल्पांसोबतच बेळगावचे पाणीही पळवण्यात आले असून, यामुळे जिल्ह्याच्या महसुलावर आणि रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे,” अशी भीती राजकुमार टोपन्नावर यांनी व्यक्त केली.

बेळगावच्या या दुरवस्थेला त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले आहे. “येथील लोकप्रतिनिधी केवळ विविध क्रीडा स्पर्धा भरवण्यात मग्न आहेत. त्यांना जिल्ह्याच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही, असे त्यांच्या वर्तनातून स्पष्टपणे दिसते,” अशा शब्दांत राजकुमार टोपन्नावर यांनी नाराजी व्यक्त केली. हुबळी-धारवाडमध्ये प्रकल्पांना विरोध होतो, पण बेळगावचे नेते मात्र शांत बसून राहतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

 belgaum

बेळगाव आणि हुबळी-धारवाड यांच्यात सातत्याने प्रादेशिक वाद निर्माण होत असून राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.

“बेळगावसाठी सध्या कोणाकडेही विकास आराखडा किंवा दूरदृष्टी नाही. जर अशीच परिस्थिती राहिली, तर बेळगावचे महत्त्व पूर्णपणे नष्ट होईल,” असा इशारा राजकुमार टोपन्नावर यांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.