belgaum

सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

0
331
Jayant patil
 belgaum

बेळगाव लाईव्ह: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. सीमाभागातील मराठी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तज्ञ समितीची बैठक बोलावण्याची विनंती यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची भेट घेऊन सीमाप्रश्न आणि मराठी जनतेच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची विनंती समितीने केली होती. या पत्राची प्रत रविवारी समितीचे प्रकाश मरगाळे यांनी जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केली.

जयंत पाटील यांनी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्राची प्रत त्यांच्याकडे सोपवली. या भेटीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील दावा आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली.

 belgaum

सीमाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक लवकरात लवकर बोलावण्यात यावी, तसेच या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

विधानसभेचे चालू अधिवेशन संपल्यानंतर तातडीने बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यापूर्वी जयंत पाटील यांनी दिवंगत दीपक दळवी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती, त्यावेळी समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.