belgaum

बेळगाव, खानापूर तालुक्यातील अवैध खाणकामाच्या चौकशीची मागणी

0
499
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर व बेळगाव तालुक्यामध्ये बॉक्साइट, लॅटेराइट आणि सिलिका या खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनियंत्रित बेकायदेशीर खाण कामाला तात्काळ आळा घालून या अवैध कारवायांची जिल्हास्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगूंद आणि राजकुमार टोपन्नावर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते मुळगूंद आणि टोपन्नावर यांनी आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. तसेच आपल्या मागणी संदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी (डीसी) निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव आणि खानापूर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये बॉक्साइट, लॅटेराइट आणि सिलिकाचे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खाणकाम होत असल्याचा आरोप असून ज्यामुळे गंभीर पर्यावरणीय नुकसान, शेतजमिनींचा नाश आणि वन्यजीवांच्या अधिवासांना धोका निर्माण होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे बेकायदेशीर खाणकाम बेळगुंदी, बाकनूर, बिजगर्णी, गोल्याळी, आमटे, बेटगेरी, किणये, इनाम बडस आणि तोराळी या गावांमध्ये होत आहे. या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मोकळ्या शेतात आणि खाजगी शेतजमिनींवर योग्य परवानगी विना खाणकाम केले जात आहे. खाणकामामुळे संपूर्ण भूदृश्य बदलण्याबरोबरच पर्यावरणाचा आणि सुपीक शेतजमिनींचा ऱ्हास होत आहे. पकडले जाऊ नये म्हणून हे खाणकाम बहुतेक रात्री उशिरा (मध्यरात्री 2 ते सकाळी 6 दरम्यान) केले जात आहे.

 belgaum

वरील गावे अत्यंत संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रात येतात. ही गावे धामणे राखीव वनाच्या निकट, तिलारी वन्यजीव अभयारण्याजवळ, भीमगड वन्यजीव अभयारण्यानजीक, अभिमत वन आणि राखीव वनक्षेत्रांना लागून, खानापूर तालुक्यात हत्तींच्या मार्गाजवळ वसलेली आहेत. तसेच येथे प्रमुख नदीप्रणालींना पाणीपुरवठा करणाऱ्या उपनद्या आणि नाले आहेत. या अवैध खाणकामामुळे जंगलतोड, जमिनीची धूप, जैवविविधतेचा ऱ्हास, वन्यजीव मार्गांना धोका, जल पुनर्भरण क्षेत्रांचा नाश, प्रदूषण आणि धुळीचा शेती व मानवी वस्तीवर परिणाम होत आहे.

वरील बाबी लक्षात घेता आपल्याला विनंती आहे की, अवैध खाणकाम कारवायांची तात्काळ जिल्हास्तरीय चौकशी करावी. त्याचप्रमाणे बाधित क्षेत्रांचे उपग्रह-आधारित नकाशे तयार करावेत. अवैध खाणकामावर देखरेख ठेवण्यासाठी दर 3 महिन्यांनी सर्वेक्षण करावे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रदेशात नवीन खाणकाम परवानग्या स्थगित कराव्यात. काढलेल्या नमुन्यांची स्वतंत्र प्रयोगशाळेत चांचणी करावी, तपासणी नाके उभारून जास्त वर्दळीच्या वाहतुकीवर देखरेख ठेवावी आणि अवैध खाणकाम रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करावी.

संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासह शेतजमिनी आणि वन्यजीव मार्गिकेचे (कॉरिडॉर) संरक्षण आणि खाणकाम केलेल्या सामग्रीच्या अवैध वाहतुकीला तात्काळ आळा घालावा. हा मुद्दा गंभीर पर्यावरणीय आणि सार्वजनिक हिताचा असल्यामुळे जर यावर तात्काळ तोडगा काढला नाही, तर पश्चिम घाटाच्या नाजूक परिसंस्थेचे आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीवर आधारित उपजीविकेचे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. तरी आपण तात्काळ हस्तक्षेप करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.