belgaum

वाद पुन्हा न्यायालयात गेल्याने …कारवाईला न्यायालयाची स्थगिती

0
854
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील शाहूनगर परिसरात अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला आज मोठी नामुष्की सहन करावी लागली. जेसीबीसह घटनास्थळी धडकलेल्या अधिकाऱ्यांना घरमालकाने न्यायालयाचा स्थगिती आदेश दाखवल्याने सुरू झालेली कारवाई तडकाफडकी थांबवण्यात आली.

शहरातील शाहूनगर भागात गेल्या पाच वर्षांपासून एका इमारतीवरून महापालिका आणि मालक जाधव यांच्यात कायदेशीर संघर्ष सुरू आहे. नियोजित ८० फूट रस्त्याच्या जागेत हे बांधकाम येत असल्याचा दावा पालिकेने केला होता. अलीकडेच न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने कौल दिल्यानंतर आज सकाळपासूनच या ठिकाणी निष्कासनाची तयारी करण्यात आली होती.

मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेचे कर्मचारी आणि जेसीबी शाहूनगरमध्ये दाखल झाले. कारवाईला सुरुवात होताच घरमालक आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वादावादी झाली. “आम्ही नियमानुसार ६० फूट रस्ता सोडून बांधकाम केले आहे, मात्र पालिका आता जास्तीच्या जागेची मागणी करत आहे,” असा पवित्रा जाधव कुटुंबीयांनी घेतला.

 belgaum

कारवाई सुरू असतानाच जाधव यांच्या वकिलांनी घटनास्थळी धाव घेत न्यायालयाकडून नव्याने आणलेला स्थगिती आदेश सादर केला. कायदेशीर अडचण निर्माण झाल्याने अधिकाऱ्यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली. या नाट्यमय घडामोडींमुळे शाहूनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता महापालिका प्रशासन यावर पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.