बेळगाव लाईव्ह :कर्नाटकात येत्या दि.15 एप्रिल ते दि. 15 मे 2026 या कालावधीमध्ये घरांची यादी आणि निवासाची माहिती संकलन प्रक्रिया राबविण्यात येणार असून या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश जनगणना संचलनालयाने दिले आहेत.
सदर संकलन प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात घरांची संख्या, भिंती व छतांसाठी वापरले साहित्य, पिण्याचे पाणी, शौचालय, वीज तसेच घरातील इतर मूलभूत सुविधा वगैरे घरांसंबंधी माहिती संकलित केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार असून त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, धर्म व भाषा यासारखी वैयक्तिक माहिती नोंदविली जाणार आहे. जनगणनेचा दुसरा टप्पा मार्च 2027 मध्ये सुरू होणार आहे. याच कालावधीत राज्यात मतदार याद्यांचे विशेष सर्वसमावेशक पुनरावलोकनही सुरू राहणार आहे. त्यामुळे बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना जनगणना कामासाठी वापरू नये असे स्पष्ट निदेश देण्यात आले आहेत.
शिक्षकांची कमतरता भासल्यास विविध विभागातील ‘सी’ गटातील कर्मचाऱ्यांचा पर्याय म्हणून उपयोग करावा असे सरकारला सूचित करण्यात आले आहे यंदाची 16 वी राष्ट्रीय जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे.
गणतीदार विशेष मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्मार्टफोनवरच माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेसाठी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे.





