बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये सायबर गुन्हेगारीच्या एका हादरवून टाकणाऱ्या घटनेत एका ज्येष्ठ उद्योजकाला तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून या टोळीने ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली या वयोवृद्ध व्यक्तीची मोठी लूट केली.
या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतल्यास असे समोर येते की, मनी लाँडरिंगच्या खोट्या प्रकरणात गोवण्याची भीती दाखवून या टोळीने उद्योजकाला व्हिडिओ कॉलद्वारे सतत नजरकैदेत ठेवले होते. अटकेचे बनावट वॉरंट आणि सीबीआयचा धाक दाखवून या व्यक्तीला मानसिक दडपणाखाली आणले आणि त्यांच्याकडून ही अवाढव्य रक्कम टप्प्याटप्प्याने उकळली. धक्कादायक बाब म्हणजे, ही १५ कोटींची रक्कम देशातील ३९० पेक्षा जास्त विविध बँक खात्यांमध्ये अतिशय वेगाने वळवण्यात आली. तपासादरम्यान असे आढळले आहे की, गुन्हेगारांनी शेकडो ‘म्युल’ (बनावट) खात्यांचा वापर करून ९५ टक्के रक्कम आधीच काढून घेतली आहे.
गुन्ह्याची व्याप्ती आणि त्याचे आंतरराज्य जाळे पाहता, बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी रीतसर पत्रव्यवहारही केला आहे. आतापर्यंत पोलिसांना ९० लाख रुपये गोठवण्यात यश आले असून उर्वरित ३९० खात्यांचा तांत्रिक तपास युद्धपातळीवर सुरू आहे. कोणत्याही सरकारी यंत्रणेकडे ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भूषण बोरसे यांनी केले आहे.





