बेळगाव लाईव्ह : देशात किंवा राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून, सध्या दिसणारी परिस्थिती ही केवळ अफवा आणि भीतीपोटी होत असलेल्या अतिरिक्त खरेदीचा परिणाम आहे. नागरिकांनी विनाकारण साठेबाजी करू नये आणि आपल्या नियमित गरजेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इंधन तुटवड्याच्या अफवा पसरल्याने नागरिक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. एका साध्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की, ज्या पेट्रोल पंपावर दिवसाला सरासरी ४,००० लिटर इंधनाची विक्री होते, तिथे अचानक एकाच दिवसात १२,००० लिटरची मागणी वाढली आहे.
ही मागणी नेहमीच्या तुलनेत ३ पटीने जास्त आहे. जेव्हा अशा प्रकारे मागणीत अचानक मोठी वाढ होते, तेव्हा पुरवठा पूर्ण असतानाही तांत्रिक कारणांमुळे पंप तात्पुरते कोरडे पडू शकतात.

सर्व तेल कंपन्यांकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून मागणीनुसार टँकर्सचा पुरवठा करण्यास त्या पूर्णपणे सज्ज आहेत. मात्र, नागरिक विनाकारण वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेत आहेत किंवा कॅन आणि बॅरलमध्ये इंधन साठवून ठेवत आहेत. या ‘बल्क बाइंग’मुळे (घाऊक खरेदी) पुरवठा साखळीवर विनाकारण दबाव निर्माण होत असून कृत्रिम टंचाईची परिस्थिती उद्भवत आहे.
जर प्रत्येक नागरिकाने आपल्या नेहमीच्या गरजेनुसारच पेट्रोल किंवा डिझेल खरेदी केले, तर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखणे आवश्यक आहे. इंधनाचा तुटवडा नसून केवळ अफवांकडे दुर्लक्ष करून जबाबदारीने वागणे ही काळाची गरज आहे. विनाकारण स्वतःहून संकट ओढवून घेऊ नका, असे आवाहन करण्यात येत आहे.





