बेळगाव लाईव्ह :बसवन कुडची येथे सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला माळमारुती पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळील धारदार तलवार जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव जिनेन्द्र पद्माप्पा चौगले (रा. शास्त्री गल्ली, बसवन कुडची बेळगाव) असे आहे जिनेन्द्र हा काल मंगळवारी शास्त्री गल्ली परिसरात सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार नाचवत दहशत निर्माण करत होता.
त्यावेळी माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडून त्याच्याजवळील धारदार तलवार जप्त केली. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, मारीहाळ गावामध्ये लोकांचे पैसे मटका जुगारावर लावणाऱ्या निंगाप्पा यल्लाप्पा नेसरगी (वय 40, रा. अंकलगी, ता. गोकाक) या मटका बुकिला मारीहाळ पोलिसांनी काल अटक केली. आरोपी निंगाप्पा हा मारीहाळ गावातील गुडदम्म मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे पैसे मटका जुगारावर लावत होता.
त्यावेळी मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एम. तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून निंगाप्पा याला रंगेहात पकडले. तसेच त्याच्या जवळील जुगारासाठी लावलेले पैसे आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.





