belgaum

मनपाच्या दंडात्मक कारवाईविरोधात बापट गल्लीतील व्यापारी आक्रमक

0
310
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेने गेल्या आठवड्यापासून शहरभरात व्यापारी परवाना तपासणीची धडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता थेट दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत बापट गल्लीतील व्यापाऱ्यांनी आज आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य निरीक्षकांच्या पथकाने उत्तर आणि दक्षिण विभागात बुधवारी ही संयुक्त मोहीम राबवली गेली. समादेवी गल्लीतील ‘कल्याणी स्वीट मार्ट’ आणि खडे बाजार येथील ‘लेन्सकार्ट’ शोरूममध्ये परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्याने प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

शहरातील प्रत्येक व्यावसायिकाने अनिवार्यपणे परवाना घेणे गरजेचे असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज बापट गल्ली येथेही हि मोहीम राबविण्यात आली. मात्र अचानक राबविण्यात आलेल्या कारवाईमुळे बापट गल्लीतील व्यापारी आक्रमक झाले आणि व्यापारी आस्थापने बंद ठेवून मनपाच्या या कारवाईचा निषेध केला.

 belgaum

यावेळी कारवाईसाठी आलेला अधिकारी आणि व्यापारी वर्गात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यापूर्वी देखील अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात आली होती, मात्र परवाना आणि नूतनीकरणाची प्रक्रिया अत्यंत किचकट असून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेळ हवा आहे, अशी माहिती स्थानिक व्यापारी भाऊ किल्लेकर यांनी दिली.

जवळपास १७० आस्थापनांवर आज कारवाईचा बडगा उगारण्यात आला, मात्र तांत्रिक अडचणींमुळे वेळ मागूनही अधिकारी अचानक आल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून या प्रभागाचे नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांच्या वतीने महापालिका अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. अखेर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत व्यापाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला आहे.

व्यापारी परवाना काढण्याची आणि जुन्या परवान्यांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ही प्रक्रिया सुलभ करावी आणि नूतनीकरणासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. बापट गल्लीत व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, घटनास्थळी उपस्थित पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नूतनीकरणासाठी मुदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.