बेळगाव लाईव्ह :नेपाळच्या राजकारणात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळत असून तरुण नेता Balendra Shah (बालेन शाह) यांनी पंतप्रधानपद मिळवत इतिहास घडवला आहे. रॅपर म्हणून लोकप्रिय असलेले आणि नंतर राजकारणात उतरलेले बालेन शाह हे नेपाळचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान ठरले आहेत.
विशेष म्हणजे बालेन शाह यांचा भारताशी, विशेषतः कर्नाटक आणि बेळगावशी शैक्षणिक संबंध आहे. त्यांनी बेंगळुरू येथील Nitte Meenakshi Institute of Technology या अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक. शिक्षण पूर्ण केले आहे. हे महाविद्यालय बेळगाव येथील Visvesvaraya Technological University (व्हीटीयू)शी संलग्न असल्याने बालेन शाह यांचे शिक्षण बेळगावशी संबंधित विद्यापीठातून झाले आहे.
नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बालेन शाह यांनी झापा–५ मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. या लढतीत त्यांनी चार वेळा पंतप्रधान राहिलेले ज्येष्ठ नेते K. P. Sharma Oli यांचा सुमारे ५० हजार मतांनी पराभव केला. या विजयामुळे नेपाळच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे.

तरुण नेतृत्व, भ्रष्टाचारविरोधी भूमिका आणि नव्या विचारांमुळे बालेन शाह यांना नेपाळमधील तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला. रॅपर म्हणून ओळख निर्माण केलेल्या बालेन शाह यांनी पुढे राजकारणात प्रवेश करत अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली.
बेळगावच्या व्हीटीयूशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेतलेला विद्यार्थी थेट नेपाळचा पंतप्रधान बनल्यामुळे कर्नाटक आणि विशेषतः बेळगाव परिसरातही याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.





