belgaum

ट्रकच्या ठोकरीने दोन ऑटो रिक्षांचा चुराडा

0
1113
 belgaum

बेळगाव लाईव्ह :चालक गेटपास घेण्यासाठी खाली उतरला असताना हॅन्ड ब्रेक न लावल्यामुळे कांद्याने भरलेला चालू ट्रक विनाचालक थेट रस्ता ओलांडून पुढे जात ऑटो रिक्षा स्टॅन्ड वरील दोन रिक्षांवर जाऊन आदळल्यामुळे एका रिक्षाचा संपूर्ण, तर दुसऱ्या रिक्षाचा अर्धाधिक चुराडा झाल्याची घटना आज दुपारी बेळगाव एपीएमसी यार्डाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडली. भर रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

याबाबत समजलेली माहिती अशी की, तोरस हा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक आज दुपारी 12:45 वाजण्याच्या सुमारास बेळगाव मार्केट यार्ड येथून कांदा भरून बाहेर पडत होता. त्यावेळी बाहेर जाण्यासाठी यार्डाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सदर ट्रकचा चालक गेट पास घेण्यासाठी खाली उतरला.

मात्र गडबडीत अनावधानाने त्याने ट्रकचा हॅन्ड ब्रेक लावला नसल्याचे कळते. परिणामी कांद्याने भरलेला चालू असलेला ट्रक चालकाविना थेट प्रवेशद्वारातून बाहेर पडला. नियंत्रण सुटलेला हा ट्रक समोरील हमरस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूस असलेल्या ऑटो रिक्षा स्टॅन्डवर थांबलेल्या दोन रिक्षांवर जाऊन आदळला.

 belgaum

या अपघातात ट्रक खाली सापडून एका रिक्षाचा संपूर्ण चुराडा होण्याबरोबरच दुसऱ्या रिक्षाचे अर्धाहून अधिक नासधूस झाले आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे मार्केट याड प्रवेशद्वाराच्या परिसरात एकच धावपळ उडाली होती. सदर अपघातामुळे दोन्ही ऑटोरिक्षांचे मिळून सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

बेळगाव एपीएमसी मार्केट यार्ड प्रवेशद्वारासमोरील हमरस्त्यावर नेहमी सततची रहदारी असते. तथापि आज दुपारी उपरोक्त अपघात घडला त्यावेळी रस्त्यावर तुरळक रहदारी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा चालकाविना ट्रक रस्ता ओलांडून रिक्षा स्टॅन्डच्या दिशेने जात असताना तो रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या वाहनाला आदळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. वरील अपघाताप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असल्याचे समजते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.